वर्धापनदिनी ‘तरुण भारत संवाद’ वर शुभेच्छांचा वर्षाव
कोल्हापूर :
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ वाचकांशी परखड, वस्तुनिष्ठ बातम्यांनी नाळ जोडणाऱ्या दैनिक ‘तरुण भारत संवाद’ च्या कोल्हापूर आवृत्तीचा 32 वा वर्धापनदिन सोमवारी वाचक आणि हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादात व अपूर्व उत्साहात साजरा झाला. दसरा चौकातील शाहू स्भारक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘महाराष्ट्र व्हिजन’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘तरुण भारत संवाद‘ वरील प्रेमाची प्रचिती दिली. दूरध्वनीद्वारे आणि सोशल मिडियावरूनही शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘तरुण भारत संवाद’ च्या संचालक रोमा ठाकुर व सई ठाकुर-बिजलानी यांनी शुभेच्छा स्विकारल्या.
लाखो वाचकांच्या पाठबळावर निर्भीड बाणा आणि विकासाची दृष्टी ठेवणाऱ्या ‘तरुण भारत संवाद‘ च्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक राजकीय, शासकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती व संस्था प्रतिनिधींसह हजारो वाचक आणि हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रारंभी सकाळी 11 वाजता दीपप्रवलन करून ‘तरुण भारत संवाद’ चे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबुराव ठाकूर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक रोमा ठाकुर, संचालक सई ठाकुर-बिजलानी, आमदार जयंत आसगावकर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ व्ही.एन.शिंदे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव, चिफ मार्केर्टिंग ऑफिसर उदय खाडीलकर, बेळगावचे संपादक विजय पाटील, विभागीय संपादक श्रीरंग गायकवाड, निवासी संपादक सुधाकर काशिद, जाहिरात व्यवस्थापक (शहर) मंगेश जाधव, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) आनंद साजणे या मान्यवरांच्या हस्ते ‘महाराष्ट्र व्हिजन’ या विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर संचालक सई ठाकुर-बिजलानी यांनी मनोगत व्यक्त करून ‘तरूण भारत संवाद’ची वाटचाल आणि त्यामधील ठाकुर परिवाराचे अमूल्य योगदान याबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर निवासी संपादक सुधाकर काशिद यांनी तरुण भारत संवाद’ची शतकोत्तर वाटचाल, जनसामान्यांशी असलेले नाते, आणि वाचकांच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान याबाबत सविस्तर विवेचन करून आभार मानले.
या स्नेहमेळाव्यास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार प्रा.संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक कामगार आयुक्त विशाल बोडके, महापालिका अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव सुभाष चौगले, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संभाजी पवार, ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणा विभागाच्या प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई, स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा समन्वयक माधुरी परीट, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, गोकुळ दुध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुक गावडे, कृष्णराज महाडिक, जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजीराव माने, विजय माने, वेंकटराव जाधव, तानाजी माने, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष संजय शेटे आदींसह शुभेच्छा देण्यासाठी हजारो वाचकांनी राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये मोठी गर्दी केली होती.
सामाजिक बांधिलकीचा वारसा जोपासणार : सई ठाकुर-बिजलानी
‘तरुण भारत संवाद’ने स्वातंत्र्यपूर्व काळापासू निष्पक्षपणाची भूमिका घेत परखड सत्य वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाच्या समोर मांडले आहे. त्यामुळे रोखठोक भुमिका मांडणारे दैनिक अशी ओळख ‘तरुण भारत संवाद’ची जनमाणसांत निर्माण झाली आहे. ‘तरुण भारत’चे संस्थापक संपादक स्व. बाबूराव ठाकूर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून दिलेला निष्पक्ष, सत्याची बाजू मांडणारा अन् सामाजिक बांधिलिकचा हा वारसा पुढील काळातही असाच जोपासणार असल्याचे ‘तरुण भारत संवाद’च्या संचालक सई ठाकुर-बिजलानी यांनी सांगितले. ‘तरुण भारत संवाद’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या 32 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित स्नेहमेळ्याव्यात त्या बोलत होत्या.
संचालक सई ठाकुर-बिजलानी म्हणाल्या, ‘तरुण भारत’चे संस्थापक संपादक स्व. बाबूराव ठाकूर यांनी 1919 साली तरुण भारतची स्थापना केली. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ‘तरुण भारत’ची महत्त्वपूर्ण अशी भुमिका राहिली आहे. त्याच पद्धतीची भुमिका आजही ‘तरुण भारत संवाद’ची राहिली आहे. तरुण भारतचे संस्थापक संपादक स्व. बाबूराव ठाकुर यांचा वारसा समूह प्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकूर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकूर, संचालक रोमा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे चालवत आहे. परखड बाजू मांडत कृषी, राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतीक, शिक्षण, पर्यटन अशा विविध क्षेत्रातील आणखी दर्जेदार बातम्या वृत्तपत्रातून वाचकांपर्यंत पोहचवणार असल्याचे संचालक सई ठाकूर-बिजालनी यांनी सांगितले.