ओबामा यांच्याकडून हॅरीसची भलावण
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
नोव्हेंबरमध्ये होणारी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. मात्र, या संघर्षात डेमॉव्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांची सरशी होईल, असा विश्वास अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ओबामा यांनी हॅरिस यांची भलावण करीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांच्यावर टीका केली. ट्रंप हे अमेरिकेसाठी धोकादायक ठरतील, असा दावा त्यांनी केला.
डेमॉव्रेटिक पक्षाने विद्यामान अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या स्थानी कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी घेतला होता. त्यानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा आशावाद जागृत झाला आहे. हॅरिस या अमेरिकेच्या हितांचे रक्षण चांगल्याप्रकारे करतील. ट्रंप यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी आज डेमॉव्रेटिक पक्षाच्या वतीने दोन ‘कृष्णवर्णिय’ व्यक्ती उभ्या आहेत. अमेरिका हॅरिस यांनाच सहकार्य करेल. अमेरिकेसाठी त्या एक चांगल्या राष्ट्राध्यक्ष सिद्ध होतील, असे प्रतिपादन ओबामा यांनी केले.
5 नोव्हेंबरला निवडणूक
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक 5 नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डोनाल्ड ट्रंप, तर डेमेक्रेटिक पक्षाच्या वतीने कमला हॅरिस असा संघर्ष होत आहे. अमेरिका हा जगातील सर्वात प्रबळ देश मानला जातो. त्यामुळे त्या देशाच्या अध्यक्षस्थानी कोण असणार, हा जगाच्या औत्सुक्याचा विषय असतो. भारतातही या निवडणुकीकडे सूक्ष्मपणे पाहिले जात आहे. कमला हॅरिस यांचे कुटुंब मूळचे भारतीय आहे. मात्र, या कुटुंबाची एक पिढी अमेरिकेत वाढलेली आहे. डोनाल्ड ट्रंप 2016 ते 2020 या काळात अमेरिकेचे अध्यक्ष होते. ते यंदा पुन्हा स्पर्धेत आहेत. हॅरिस यांची ही पहिलीच अध्यक्षीय निवडणूक आहे. त्या सध्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष आहेत.