तळंदगे ग्रामपंचायतीच्या चौकशी अहवालावरून जि.प.मध्ये गोंधळ
कोल्हापूर :
हातकणंगले तालुक्यातील तळंदगे ग्रामपंचायतीमध्ये 40 लाखांचा अपहार झाल्याची तक्रार सुमारे 12 तक्रारदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारीची चौकशी होऊन सुनावणीअंती 9 डिसेंबर 2024 रोजी अहवाल तयार झाला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात दुसरी एक तक्रार याच तक्रारदारांनी जिल्हा परिषदेकडे दिली होती. या दोन्ही तक्रारींची चौकशी होऊन अहवाल तयार झाला असला तरी त्याची प्रत दिली जात नसल्याचा आरोप करून धैर्यशील चौगुले, राजेंद्र हावलदार, धनाजी पोळ, सागर मेटकर आदी तक्रारदारांनी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील संबंधित तक्रारदारांना धारेवर धरले. पण ज्यांच्याकडे चौकशी अहवाल आहे, ते कर्मचारी हजर नसल्यामुळे अहवाल नंतर देतो असे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. अखेर तक्रारदारांच्या आक्रमक भूमिकेनंतर चौकशी अहवाल उपलब्ध करून त्यांना देण्यात आला.
मुल्यांकनाशिवाय रक्कम अदा करणे, नियमबाह्यरित्या मुल्यांकनापेक्षा जादा रक्कम अदा करणे आणि कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल सरपंच संदीप अर्जुनराव पोळ यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39 नुसार कार्यवाही करण्यात यावी, असा स्वयंस्पष्ट अहवाल सीईओ कार्तिकेयन एस यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्याची प्रत तक्रारदारांना शुक्रवारी देण्यात आली. दरम्यान अपहाराबाबत त्यांनी दुसरी एक तक्रार तत्कालिन ग्रामसेवक व सरपंचाविरोधात केली होती. त्याचाही अहवाल द्यावा अशी मागणी तक्रारदारांनी यावेळी केली. ग्रामसेवकांसह संबंधित अधिकाऱ्यांचा बचाव करण्यासाठी तो अहवाल दिला जात नसल्याचा आरोप यावेळी तक्रारदारांनी केला.
तक्रारदारांकडून उद्धट वर्तणूक
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी होऊन अहवाल तयार झाला आहे. पण च्या कर्मचाऱ्याकडे ती जबाबदारी आहे, ते उपस्थित नसल्यामुळे अहवाल थोड्या वेळाने देतो असे तक्रारदारांना सांगितल्यानंतर त्यांनी उद्धट वर्तणूक करून कर्मचाऱ्यांना दमदाटी केली असा आरोप जि.प. ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांनी केला.