नव्या मतदार नियमांवरून जम्मू-काश्मीरमध्ये गोंधळ
पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सचा तीव्र विरोध
श्रीनगर / वृत्तसंस्था
गैर-स्थानिक लोकांना मतदार बनवण्याच्या निर्णयावरून जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. पीडीपीचे मुख्य प्रवक्ते सुहेल बुखारी यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाच्या नेत्यांनी निर्णयाचा निषेध केला. मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनंतर पीडीपी (जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. दोन्ही पक्षांनी या निर्णयावर आरोप करताना हे सरकारचे मोठे कारस्थान असल्याचे स्पष्ट केले आहे.
जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी बुधवारी मतदार यादीबाबत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये मतदार होण्यासाठी अधिवास असणे आवश्यक नसल्याचे म्हटले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती भडकल्या. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीर भाजपची प्रयोगशाळा बनली असून राज्यात भाजपकडून 25 लाख मतदार बाहेरून आणले जात असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला.
दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तन्वीर सादिक यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. हय़ा निर्णयामुळे इतर राज्यातील लोक काश्मीरमध्ये येऊन मतदार नोंदणी करू शकतात. तसेच मतदान केल्यानंतर परत आपापल्या राज्यात जाऊ शकतात, असा दावा नॅशनल कॉन्फरन्सने केला आहे. तसेच राज्यातील जनता अधिकारापासून वंचित राहणार असून लोकांच्या मनात अनेक शंका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.