गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये गोंधळ
त्रास दिला जात असल्याचा हार्दिक पटेलचा दावा : राहुल गांधींवरही केला आरोप
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. पण त्यापूर्वी काँग्रेस पक्ष मजबूत होण्याऐवजी विखुरण्याच्या मार्गावर जाताना दिसून येतोय. पक्षाचे राज्यातील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे नेतेच मी पक्ष सोडावा अशी इच्छा बाळगून असल्याचा आरोप गुरुवारी केला. पक्षाचे नेतृत्वच मला त्रास देत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना याविषयी अनेकदा कळविले, परंतु कुठलाच निर्णय झाला नसल्याचा दावा हार्दिक यांनी केला.
मागील 3 दशकांपासून गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर न राहण्यामागे गटबाजी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची अन्य पक्षांसोबत असलेली ‘गुप्त आघाडी’ कारणीभूत आहे. 2017 मध्ये काँग्रेसच्या बाजूने मोठे वातावरण होते, परंतु चुकीच्या तिकिटवाटपामुळे सत्ता मिळविता आली नसल्याचे म्हणत हार्दिक यांनी पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात उघड भूमिका मांडली आहे.
पाटीदार आरक्षण आंदोलन उभे करून आम्ही काँग्रेसला लाभ मिळवून दिला हाहेता. आमची शक्ती आणि काँग्रेसची शक्ती एकत्र आल्यावर राज्याला आम्ही एका नव्या स्थितीत आणू शकू असे वाटले होते. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनीच आमच्या शक्तीला कमकुवत केल्याचे हार्दिक यांनी म्हटले.
मला कार्यकारी अध्यक्षपद दिले, परंतु कुठलेच काम दिले नाही. कुठल्याही महत्त्वाच्या बैठकीत मला बोलाविले जात नाही. कुठल्या निर्णयप्रक्रियेत सामील केले जात नाही. काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षपद म्हणजे काय हा प्रश्न मला पडला आहे. पक्ष सोडण्याकरता मी नाराजी व्यक्त करत नाही. पक्षाची स्थिती अत्यंत खराब आहे, जे शक्तिनिशी लढणारे आहेत, त्यांना संधी देण्यात यावी असे हार्दिक म्हणाले.