बेळगाव-मुंबई विमानफेरीचे बुकिंग बंद असल्याने संभ्रम
17 ऑगस्टनंतर विमान उपलब्ध नसल्याची माहिती
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
बेळगावहून मुंबईला विमान प्रवासाचे बुकिंग करणाऱ्या नागरिकांना 17 ऑगस्टपासून बुकिंग होत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या स्टार एअरच्या वेबसाईटवरून 16 ऑगस्टपर्यंतच विमानसेवा दाखवली जात असल्याने त्यानंतर बुकिंग करणारे प्रवासी बुचकळ्यात सापडले आहेत. काही जणांनी विमान कंपनीशी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही योग्य उत्तर मिळाले नाही.
स्टार एअर कंपनीकडून बऱ्याच वेळा बुकिंगविषयी तांत्रिक अडथळे येत असतात. सध्या बेळगाव-मुंबई या महत्त्वाच्या मार्गावर स्टार एअरकडून सेवा दिली जात आहे. परंतु विमानाचे तिकीट बुकिंग करणाऱ्यांना 17 ऑगस्टनंतर बुकिंग होत नसल्याचे दिसून येत आहे. वेबसाईटवर त्या काळात विमान उपलब्ध नसल्याचे दाखविले जात आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना एक तर हुबळी अथवा गोव्यातून बुकिंग करावे लागणार आहे.
एकीकडे स्टार एअरकडून मुंबई व अहमदाबाद या मार्गावर 25 ऑक्टोबरपासून सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत असतानाच मध्यंतरीच बुकिंग थांबविण्यात आल्याने यामागचे कारण अस्पष्ट आहे. बऱ्याच वेळा एअरक्राफ्टची कमतरता, पायलटची संख्या यामुळे विमाने रद्द केली जात असतात. परंतु याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे बुकिंग करणाऱ्यांना अडचणी येत आहेत.
जर स्टार एअरने 17 ऑगस्टनंतरचे बुकिंग सुरू केले नाही तर प्रवाशांना एकतर बेळगाव-नवी मुंबई विमानफेरीचा आधार घ्यावा लागेल. अन्यथा बस अथवा खासगी वाहतुकीने हुबळी किंवा गोवा गाठत तेथून विमानप्रवास करावा लागणार आहे. उद्योग-व्यवसायासाठी मुंबई सेवा सर्वात महत्त्वाची असल्याने तातडीने ही सेवा पूर्ववत होण्याची मागणी उद्योजकांतून केली जात आहे.