For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मूल्यांकन परीक्षा स्थगितीमुळे संभ्रम

10:50 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
मूल्यांकन परीक्षा स्थगितीमुळे संभ्रम
Advertisement

परीक्षा पार पडणार की रद्द होणार? : पाचवी, आठवी, नववीचे विद्यार्थी बुचकळ्यात

Advertisement

बेळगाव : मूल्यांकन परीक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पाचवी, आठवी व नववीचे विद्यार्थी बुचकळ्यात सापडले आहेत. प्रथम भाषा व द्वितीय भाषा विषयाचे पेपर घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी पुढील पेपरची तयारीही केली होती. परंतु, मंगळवारी रात्री झालेल्या निर्णयामुळे बुधवारी विद्यार्थी शाळेत आले, परंतु परीक्षांची उजळणी करून पुन्हा घरी गेले. यामुळे या परीक्षा पुन्हा होणार की रद्द होणार? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. यावर्षीपासून शिक्षण विभागाने पाचवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर मूल्यांकन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सोमवार दि. 11 पासून मूल्यांकन परीक्षेला सुरुवातही झाली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या परीक्षेला स्थगिती दिली. सोमवारपासून मूल्यांकन परीक्षा वगळता इतर परीक्षांनाही सुरुवात झाली आहे. यामुळे शाळांमध्ये परीक्षांचे वातावरण तयार झाले आहे. परंतु, अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व पालकही संभ्रमात आहेत. बुधवारी विद्यार्थी शाळेत दाखल झाले. परंतु, परीक्षा नसल्याने शिक्षकांनी त्यांची उजळणी घेतली. तूर्तास परीक्षेला स्थगिती असली तरी या परीक्षा होणार की नाहीत? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. सोमवार दि. 25 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने त्यापूर्वी शालान्त परीक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा सुरू आहे. परंतु, मूल्यांकन परीक्षेला स्थगिती दिल्याने उर्वरित पेपर लांबणीवर पडले असून येत्या दोन दिवसांत निकाल न झाल्यास या परीक्षा पुढील आठवड्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

इतर वर्गांच्या परीक्षा सुरळीतपणे सुरू

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पाचवी, आठवी व नववीच्या मूल्यांकन परीक्षा थांबविण्यात आल्या आहेत. मात्र, इतर वर्गांच्या परीक्षा सुरळीत पद्धतीने सुरू असून विद्यार्थ्यांनी नियमितपणे या परीक्षांना हजेरी लावावी.

- आय. जी. हिरेमठ (सीआरपी बेळगाव शहर)

Advertisement
Advertisement
Tags :

.