गाझामधील संघर्ष थांबला, प्रयत्नांना यश
इस्रायल-हमास यांच्यात सहमती झाल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा : शांतता कराराचा पहिला टप्पा गुरुवारपासून लागू
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
गाझामध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला समाप्त करण्यासाठी इस्रायल आणि हमासने अमेरिकेच्या मध्यस्थीतील शांतता कराराचा पहिला टप्पा गुरुवारपासून लागू झाला आहे. गाझामध्ये त्वरित युद्धविराम प्रभावी झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी याची घोषणा केली आहे. लवकरच सर्व ओलिसांची मुक्तता केली जाईल आणि इस्रायल स्वत:च्या सैन्याला एका निश्चित रेषेपर्यंत मागे घेणार आहे. ठोस आणि स्थायी शांततेच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत गाझामध्ये हमासकडून इस्रायली ओलिसांची सोमवारपर्यंत मुक्तता केली जाण्याची अपेक्षा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प लवकरच इजिप्तच्या दौऱ्यावर जातील. हा करार इजिप्तमध्ये 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या अप्रत्यक्ष चर्चेनंतर झाला आहे. कराराच्या तरतुदीत गाझामधून इस्रायलच्या सैन्याची माघार आणि कैद्यांची अदलाबदली सामील आहे. करार लागू झाल्याच्या 72 तासांच्या आत जवळपास 2 हजार पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात सर्व जिवंत इस्रायली ओलिसांची मुक्तता केली जाणार आहे. ओलिसांची मुक्तता लवकरच सुरू होईल, अशी इस्रायलला अपेक्षा आहे. ओलिसांच्या मुक्ततेत मृत लोकांचे पार्थिवही सामील असल्याचे इस्रायलच्या सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
कैद्यांच्या मुक्ततेच्या बदल्यात इस्रायल गाझामधून सैन्य मागे घेईल. इस्रायलकडून कराराचे पूर्णपणे पालन करविण्यात यावे, असे आवाहन हमासने ट्रम्प आणि हमीदार देशांना केले आहे. यावर ट्रम्प यांनी सर्व पक्षांसोबत समान वर्तन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प यांनी कतार, इजिप्त आणि तुर्कियेचे मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी आभार मानले आहेत.
इजिप्तमध्ये शांतता चर्चा सुरू राहणार
गाझामध्ये हमासकडून शस्त्रास्त्रs खाली ठेवण्याच्या मुद्द्यावर कोणता निर्णय घेण्यात आला, हे अद्याप स्पष्ट नाही. ट्रम्प यांनी शांतता करारावर हमासने गाझाचे शासन सोडण्यासोबत शस्त्रास्त्रs खाली ठेवण्याची अट ठेवली होती. हमासने यापूर्वीच्या चर्चेदरम्यान या मागण्या मान्य करण्यास नकार दिला होता. या न सुटलेल्या मुद्द्यांना निकाली काढण्यासाठी इजिप्तमध्ये चर्चा सुरू राहणार असल्याने कराराच्या पुढील टप्प्यांना आकार मिळण्याची अपेक्षा असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचा इजिप्तदौरा
चालू आठवड्याच्या अखेरीस इजिप्तचा दौरा करू शकतो. गाझा युद्ध समाप्त करण्याचा करार दृष्टीपथात आहे. चर्चा अत्यंत चांगल्याप्रकारे इजिप्तमध्ये पुढे सरकत असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प हे शुक्रवारी वॉल्ट रीड मेडिकल सेंटरमध्ये स्वत:च्या तपासणीनंतर त्वरित मध्यपूर्वेच्या दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असल्याची माहिती व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी दिली.
ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी योजनेचे स्वरुप
- इस्रायल-हमासला त्वरित गाझामधील युद्ध समाप्त करावे लागणार
- गाझामधून इस्रायल स्वत:च्या सैन्याला टप्पाबद्ध स्वरुपात मागे हटविणार
- हमासला 72 तासांमध्ये सर्व इस्रायली ओलिसांची मुक्तता करावी लागणार, मृतदेहही परत करणार
- युद्ध थांबल्यावर इस्रायलला 250 लोक, 1700 कैद्यांना सोडावे लागणार
- प्रत्येक मृत इस्रायली ओलिसाच्या बदल्यात 15 पॅलेस्टिनी कैद्यांचे मृतदेह परत करावे लागणार
- गाझामधून हमासचे सर्व तळ आणि शस्त्रास्त्रs हटविण्यात येणार
- हमास आणि अन्य सशस्त्र गट गाझाच्या सरकारमध्ये सामील होता येणार नसल्याची अट सामील
- गाझासाठी एक अस्थायी तांत्रिक समिती स्थापन केली जाणार
- शांतता बोर्ड स्थापन करणार, अध्यक्षत्व ट्रम्प यांच्याकडे, टोनी ब्लेयर, अन्य देशांचे नेते सामील होणार
- गाझाच्या विकास आणि सुधाराची योजना बोर्ड तयार करणार, त्यासाठी येणारा खर्च देखील उचलणार
- गाझापट्टीला त्वरित पुरेशी आर्थिक मदत देण्यात येणार
- गाझामध्ये खास व्यापारी क्षेत्र निर्माण केले जाणार, यामुळे रोजगार वाढणार
- कुणालाच गाझा सोडण्यास भाग पाडले जाणार नाही, पॅलेस्टिनी स्वत:च्या इच्छेनुसार तेथे परतू शकणार
- आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल गाझामध्ये सुरक्षा व्यवस्था सांभाळणार
- सुरक्षा दल गाझा पोलिसांना प्रशिक्षण देत मोठी मदत करणार
- इस्रायल-इजिप्त या देशांच्या सीमांवर सुरक्षा मजबूत केली जाणार
- युद्ध संपेपर्यंत दोन्हींकडून हवाई हल्ले आणि गोळीबार बंद होणार
- आंतरराष्ट्रीय संघटना गाझामध्ये मदत अन् सुरक्षेची देखरेख करणार
- इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान शांततेसाठी चर्चा सुरू होणार
- गाझामध्ये स्थायी शांतता, विकास अन् चांगल जीवन आणणे उद्देश