For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मविश्वासाने मैदानात उतरल्यास सर्व रेकॉर्ड मोडू! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास

04:59 PM Sep 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
आत्मविश्वासाने मैदानात उतरल्यास सर्व रेकॉर्ड मोडू  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास
Devendra Fadnavis
Advertisement

कोल्हापुरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने संविधान बदलण्याबाबत फेक नॅरेटिव तयार केले. यामुळे दलित,आदिवासी मते भाजपासून दुरावून महाराष्ट्रात भाजपला फटका बसला. पण असे फेक नॅरेटिव्ह फार काळ चालत नाही. लोकसभा निवडणूकीनंतर महायुती शासनाने अनेक लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. या योजना लोकापर्यंत पोहोचवून आत्मविश्वासाने मैदानात उतरल्यास मागील सर्व रेकॉर्ड मोडू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार येथे झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

Advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही हे सत्य आहे. लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने संविधान बदलण्यावरुन फेक नॅरिटेव सेट केले. संविधान संपवणार, आरक्षण रद्द करण्यात येणर अशा प्रकारचा नॅरेटिव दलित, आदिवासी समाजात पसरवला. या आधारावर विरोधकांना मते गेली. आज संपूर्ण मातंग, आदिवासी समाज आपल्या पाठीशी उभा आहे. कांदा, सोयाबीन, कापूस, ऊस पिकाच्या संदर्भात लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांमध्ये निराशेची भावना येईल असे विरोधकांकडून प्रयत्न केले.त्याचा फटका आपल्याला बसला. लोकसभा निवडणूकीनंतर ही माहिती पक्षाचे नेते अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवली. यानंतर शेती मालाला भाव मिळाला. शेतकऱ्यांमध्ये समाधानाची परिस्थिती निर्माण करत आहोत. 44 लाख कृषीपंपाचे वीज बिल पूर्ण माफ केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा भरावा लागणार नाही. एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयांचा पिक विमा देणार आहोत. बारा हजार मेगा वॅट वीज सोलरवर रुपांतरित करण्याची व्यवस्था केली. यामुळे शेतकऱ्यांना अखंड वीज मिळणार आहे.

दुष्काळी भागाला हजारो कोटी रुपये देण्यात आल्यामुळे हा भाग दुष्काळ मुक्त होत आहे. सांगली, कोल्हापुरात येणाऱ्या पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याठी हजारो कोटी रुपये देण्यात येत आहेत. लाडकी बहीण योजनेतून एक कोटी 60 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. पुढच्या महिन्यात दोन कोटी 50 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. महिला या जात धर्माच्या पलीकडे जावून मतदान करतात. त्यामुळे महिला मतदार प्रामाणिक आहेत.विरोधकांनी तयार केलेल्या फेक नॅरेटिवला भाजपच्या कार्यकर्त्यांनी उतर द्यायचे आहे. भाजपचा कार्यकर्ता संवेदनशील आहे. शंभर कामापैकी पन्नास कामे होतात.पण झालेल्या पन्नास कामांचा आपण दिंडोरा पिटला पाहिजे.लाडकी बहिण योजनेतून महायुतीच्या सरकारने पंधराशे रुपये दिले. पण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने फुटकी कवडी तरी दिली का अशी विचारणा फडणवीस यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रात भाजप हाच प्रमुख पक्ष आहे. सातारा जिह्यात शंभर टक्के आमदार महायुतीचे निवडून येऊ शकतात. आत्मविश्वासाने मैदानात उतरल्यास मागचे सर्व रेकॉर्ड तोडू असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
-----------------------------
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार-रावसाहेब दानवे-पाटील

Advertisement

माजी मंत्री रावसाहेब दानवे-पाटील म्हणाले,लोकसभा निवडणुकीचा सहा महिन्यांचा काळ गेला.महायुती सरकारने सहा महिन्यात राबवलेल्या योजनांमुळे राज्यातील वातावरण बदलले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदार भाजपला मतदान करतील असा संकल्प करूया. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लोकांना संविधानाबाबत गोंधळात टाकले.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी खऱ्या अर्थाने आरक्षण द्यायला सुरुवात केली. काँग्रेस 75 वर्षात संविधान लागू करू शकले नाही. शेतकऱ्यासाठी महायुती सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले.यामुळे महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार येणार असा विश्वास दानवे-पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे.चंद्रशेखर बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.51 टक्के मते घ्यायची आहेत. मी मावळा अभियान सुरु करण्यात येणार आहे. एससी, एसटी, ओबीसी समाजात संविधाना बाबत झालेला गैरसमज दूर करायचा आहे. राहुल गांधीं यांचे षडयंत्र घरोघरी पोहचवण्याचे आहे असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

लोकसभा निवडणूकीत व्होट जिहाद
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीत आपल्याला जागृत व्हावे लागेल.असा व्होट जिहाद एकदाच करता येतो वारंवार करता येत नाही.

Advertisement
Tags :

.