महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हरल्याची कबुली, जिंकण्याचा निर्धार!

06:56 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाविकास आघाडीने सेट केलेले नरेटीव (महाकथन) उधळून लावण्यात आपण अपयशी ठरलो आणि राज्यात  लोकसभेची लढाई हरलो अशी कबुली अखेर भाजपच्या नेत्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ती सर्वात आधी दिली होती आणि पुढे विधानसभेला असे घडू नये म्हणून ’मला यातून मोकळे करा’ म्हणजे पक्षकार्य करायला मी मोकळा असेन अशी दिल्लीतील नेत्यांना सूचनाही केली होती.  आता हळूहळू चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील यांनीही सूर बदलून तसलेच गाणे सुरू केले आहे. हरल्याची ही कबुली आणि येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकण्याचा निर्धार त्यांच्या पक्ष कार्यकर्ता संमेलनात आवश्यक होता. पण येथे कार्यकर्त्यांचे किती ऐकून घेतले आणि खेळणे समजून त्यांनाच  पुन्हा कशी चावी देण्याचा प्रयत्न झाला ते दिसत आहेच. इतके धक्के बसूनही भाजप संघटनेचे पदाधिकारी असलेले नेते वास्तवाच्या बाबतीत मात्र उदासीनच राहत आहेत. आपले फसलेले नरेटीव पुन्हा रेटण्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचाच भर दिसतो. कदाचित त्यांच्याकडून अद्याप उघडपणे कोणी राजीनामा मागितला नसल्याने त्यांची ही बडबड असावी. वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्यात या आणि अशाच वादग्रस्त आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रत्यक्ष प्रश्नांपासून खूप दूर असणाऱ्या मुद्द्यांवर बावनकुळे आज सुद्धा बोलत आहेत. कार्यकर्त्यांना भरकटवत आहेत. दहा वर्षे केंद्रात आणि सातवर्षे राज्यात सत्तेवर असताना जे काम हाती घेतले नाही ते निवडणुकीनंतर करण्यासाठी सत्ता मागण्या इतकेच हे हास्यास्पद आहे. त्याचा परिणाम त्यांच्या पक्षाच्या विरोधात विरोध एकवटण्यावर होत आहे, याची त्यांना फिकीर नसावी. भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरसा दाखवला असला तरी त्याचा परिणाम पक्ष पदाधिकाऱ्यांवर झाला नसावा. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक, नगर, पुणे, सोलापूर पट्ट्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि ग्राहक व शेतकरी यांच्या हिताचा ताळमेळ साधण्याची केंद्र सरकारकडे मागणी करूनही दुर्लक्ष झाल्यामुळे फटका बसल्याचे अर्थातच पराभव झाल्याचे मान्य केले गेले आहे. भाजपचा आणखी एक मित्रपक्ष शिवसेना. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील सर्वच विभागातील शेतकऱ्यांना आपण नाराज केले आहे, याची जाणीव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचा झालेला दाऊण पराभव त्यांनी राष्ट्रीय कृषिमूल्य आयोगाच्या बैठकीत मान्य केला. भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल सध्या राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच पुढाकाराने राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक अध्यक्ष आलोक शर्मा यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांनी एक चांगला पायंडा पाडला. त्यामुळे या पुढच्या काळात राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बैठका होतील, तिथले मुख्यमंत्री आवर्जून या बैठकीला उपस्थित राहतील अशी आशा निर्माण झाली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी, कृषीमूल्य आयोगाने शेतकऱ्यांचा विचार करून सोयाबीन, कांदा उत्पादकांचा रोष कसा निर्माण झाला यावर भाष्य केले. शेतकऱ्यांना एमएसपी, मिलेट्सना सुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी कृषिमूल्य आयोगाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे झालेल्या दुर्लक्षाला त्यांनी सुद्धा प्राधान्य दिले. मात्र राज्यातील प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपचा अजेंडा मात्र या लोकाभिमुख मुद्द्यांपासून दूरच कुठेतरी भरकटत चालला आहे. हे भरकटणे पक्ष म्हणून सुद्धा योग्य नाही आणि देशातील सत्ताधारी म्हणून सुद्धा योग्य नाही. राज्यात डबल इंजिनचे सरकार पुन्हा सत्तेवर आले पाहिजे. अन्यथा महाविकास आघाडीचे सरकार केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबवणार नाही आणि त्यामुळे जनतेचे नुकसान होईल, अशी भीती बावनकुळे यांनी घातली. ते एखाद्या वेळी योग्य म्हणता येईल. या कथानकाला काही आधार आहे आणि त्यात जनतेच्या हिताची चिंता तरी दिसते. पण या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या मनात काय खदखद सुरू आहे, ती ही जाणून घेण्याची गरज होती. भाजपचे कार्यकर्ते घरोघर का पोहोचले नाहीत, संघाच्या स्वयंसेवकांनी प्रचारापासून स्वत:ला अलिप्त का ठेवले? इतकी कुरघोडी तिन्ही पक्षात झाली, ती कोणत्या कारणांमुळे झाली आणि यापुढे तरी ती थांबणार आहे का? या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करायला पक्ष पदाधिकाऱ्यांनी वाव ठेवला नाही हे दुर्दैवच. ही खदखद मनात घेऊन ते पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत म्हणजे आपापल्या गावागावात ते नेमके करणार काय आहेत? एकदा अपयश आले की त्याचे खापर दुसऱ्याच्या डोक्यात फोडण्यासाठी नेते कारण शोधत असताना कार्यकर्त्यांसमोर लढाई आहे. ठाकरे, पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र येऊन राज्यात पुन्हा महाविकास आघाडी एक दिलाने विधानसभेला लढून यश मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. महाआघाडीतील प्रत्येक नेत्यांनी स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केल्याने आता हे पक्षही विखुरणार असे वातावरण निर्माण झाले होते. पण, तातडीने सावरत त्यांनी आम्ही एकत्र लढणार असे निर्धार व्यक्त केला आहे. पावणेदोनशे विधानसभा मतदारसंघात महायुतीची लोकसभेला पीछेहाट झालेली आहे. आणि विरोधी मतदानाचे मुद्दे अधिक बळकट आहेत. अशा स्थितीत नकारात्मकते ऐवजी सकारात्मक प्रचार आणि त्याद्वारे जिंकण्याचा मानस लोकांच्या समोर मांडणे अपेक्षित होते. हे काम महाविकास आघाडीने चांगल्या पद्धतीने केले. पण, भाजप नेतृत्व अजूनही चुकीच्या मुद्द्यांना कवटाळून बसले आहे. आपण म्हणतो तेच खरे होईल अशी वाट पाहत बसणे लोकसभा निवडणुकीत महागात पडले आहे. अशावेळी भाजपचे नेते ज्या प्रकारची वक्तव्ये करत आहेत, त्यातून लोकांच्या मनात कोणती भावना निर्माण होणार हे सर्वश्रुत आहे. तरीही तोच खेळ करत बसण्यात ते वेळ घालवत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article