गुहागर बसस्थानकात वाहकाला मारहाण
गुहागर :
गुहागर बसस्थानकावरुन सुटणारी गुहागर-धोपावे एसटी सोडण्यावरुन बसच्या वाहकाला एका प्रवाशाने धमकी देत त्याला मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 5.45 घडली. या प्रकरणी वाहक चाँद नजीर शेख याने पंढरी पांडुरंग पावसकर यांच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गुहागर एसटी आगारात 2019पासून वाहक तथा चालक म्हणून सेवा बजावणारे चाँद नजीर शेख व त्यांचे सहकारी चालक सुधीर दत्ताराम खांडेकर 10 एप्रिल रोजी गुहागर-धोपावेमार्गे सावंतवाडी या गाडीवर कर्तव्य बजावत होते. गुहागर बसस्थानकाच्या फलाटावऊन सायंकाळी 5.45 वा. ही बस सोडण्यासाठी मागे घेत असताना एक प्रवासी बसजवळ आला. त्याने वाहक शेख यांना ही बस धोपावेला जाणार आहे का, अशी विचारणा केली. यावर शेख यांनी ‘ही बस धोपावे-सावंतवाडी थांब्यापर्यंत जाईल, अशा आम्हांला आगारातून सूचना असल्याचे शेख यांनी सांगितले. तसेच तुम्ही बसस्थानक नियंत्रण कक्षात विचारा, असे सांगितले. यावर प्रवाशाने अपशब्द वापरत शेख यांच्याबरोबर हुज्जत घातली. यावेळी काही प्रवाशांनी प्रकरण मिटवण्याची मध्यस्थी केली या दरम्यान, चालक सुधीर खांडेकर, कंट्रोलर सुधाकर पालशेतकर तेथे आले व त्यांना समजावण्याचा प्रयत्न कऊ लागले. मात्र त्या प्रवाशाने ऐकून न घेता शेख यांच्यावर धावून जाऊन त्यांना मारहाण केली.