संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्या
सरपंच संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात जे जे कोणी आरोपी असतील त्यांची त्वरित चौकशी होऊन त्यांच्यावर मोक्कांतंर्गत कारवाई होऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून महाराष्ट्र राज्यात भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्यास कुणास धाडस निर्माण होणार नाही, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज सरपंच संघटनेच्यावतीने सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम यांना सादर करण्यात आले.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा जिल्ह्यातील सर्व सरपंच निषेध करीत असून गावचा प्रथम नागरिक या पदाने गावातील विकासाची व जनतेची सेवा करीत असताना अश्या पद्धतीने कट रचून सरपंचावर हल्ला करून मानवतेला काळीमा लावणाऱ्या अशा पद्धतीने हत्या करण्यात आली ही महाराष्ट्राला हादरविणारी घटना आहे. सरपंच हा गावातील विकासाचा प्रमुख मानला जातो त्या लोकप्रतिनिधीची जर अशा प्रकारे हत्या होत असेल तर भविष्यात गावात लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिक कर्तव्य सेवा करण्यास कुणी पुढे येणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून सदर हत्या प्रकरणाची लवकरात लवकर सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना योग्य न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन सरपंच संघटनेने सादर केलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.