अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा
इस्लामपूर :
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. निचरा होत नसल्याने शेतीची मशागत, पेरणी करणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. शेतात लागवड योग्य कोणत्याही प्रकारचे कामे करता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
आ. जयंतराव पाटील यांनी सांगली, इस्लामपूर, आष्टा परिसरातील तसेच वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी मांडलेल्या व्यथा ऐकून घेतल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने कृषी व महसुल विभागाच्या वतीने तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी आमदार पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.