लोकापूर-सौंदत्ती-धारवाड रेल्वेमार्गाचे फेर सर्वेक्षण करा
खासदारांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात. या अनुषंगाने लोकापूर-सौंदत्ती-धारवाड रेल्वे मार्गाची आवश्यकता आहे. यापूर्वी या मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले होते. परंतु योग्य पाठपुरावा नसल्याने हा प्रकल्प मार्गी लागला नाही. सध्या या रेल्वे रस्त्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी खा. जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. खासदार शेट्टर यांनी बुधवारी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन बेळगाव संदर्भात विविध मुद्यांवर चर्चा केली. 2022-23 या आर्थिक वर्षात यल्लम्मा देवीचे तब्बल 1 कोटी 23 लाख भाविकांनी दर्शन घेतले. यामुळे बऱ्याचवेळा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असते. हे टाळण्यासाठी लोकापूर-सौंदत्ती धारवाड असा रेल्वेमार्ग झाल्यास भाविकांची सोय होणार आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाचे फेर सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.
वंदे भारतचा बेळगावपर्यंत विस्तार करा
बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. वेळेचे नियोजन होत नसल्याचे उत्तर रेल्वेने दिले होते. परंतु नवीन वेळापत्रक तयार करून ही एक्स्प्रेस बेळगावपर्यंत आणावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली. रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वंदे भारतसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करू, असे स्पष्ट केले.