आत्मनिर्भर भारतासाठी अनुकूल
मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून तो आत्मनिर्भर भारतासाठी अनुकूल असल्याचे म्हटले आहे. डबल इंजिन सरकारचा हा अर्थसंकल्प असून तो किसान, नारी, युवाशक्ती, गरीब कल्याण यावर आधारित आहे. त्या सर्वांवर अर्थसंकल्पातून भर देण्यात आला असून नोकरदार व मध्यमवर्गीयांना तो अर्थसंकल्प हितकारक ठरणार असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, महिला आणि युवावर्ग व त्याची कुशलता यावर अर्थसंकल्पातून प्रकाशझोत टाकण्यात आला असून गोवा राज्याने पुढे आणलेल्या स्वयंपूर्णतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प रोजगारभिमुख असून येत्या 5 वर्षात 20 लाख युवकांना कुशल करण्याचे व स्वयंपूर्ण बनवण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना वेतनही देण्यात येणार आहे. देशातील सुमारे 1000 प्रशिक्षण संस्थेतून त्यांना कुशलतेचे धडे देण्यात येणार आहेत. शिवाय सेवा क्षेत्रासाठी 500 नामवंत उद्योगातून सुमारे 1 कोटी युवकांना इंटरशीफ, अॅप्रेटीसशीपच्या माध्यमातून तयार करण्याचे लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. विविध प्रकारच्या विकासकामांचे आराखडे तयार करून त्यासाठी खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. मानव संसाधन, सामाजिक न्यायासाठी लक्ष केंद्रीय करण्याचे अर्थसंकल्पातून सूचित करण्यात आले आहे. डॉ. सावंत यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे आभार मानले आहेत.