पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचे सांत्वन
वृत्तसंस्था / अहमदाबाद
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून अनपेक्षितरित्या धक्कादायक पराभव झाल्याने भारतभर दु:खाचे वातावरण आहे. भारतीय संघानेही या पराभवानंतर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली होती, अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे त्याच्या कक्षात जाऊन सांत्वन केले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळविलेल्या मोहम्मद शमीला त्यांनी आपल्या कवेत घेऊन त्याची समजूत काढली. भारतीय खेळाडूंनीच नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या या भावनेने ओथंबलेल्या भेटीचे चित्रण सोशल मिडियावर प्रसिद्ध केले आहे. असंख्य भारतीयांनी ते पाहिले आहे.
‘आपल्या संघाचा पराभव झाला असला, तरी आम्ही सर्वजण संघासोबत आहोत. आपल्या संघाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे. ती विसरली जाऊ शकत नाही. भारतीय क्रिकेटचा भविष्यकाळ उज्ज्वल असून या संघातील खेळाडूंनी साकारलेली परंपरा यशस्वीरित्या पुढे नेली जाईल, असा विश्वास वाटतो,’ अशा अर्थाचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंची भेट घेतल्यानंतर काढले आहेत.
जडेजाकडून छायचित्र प्रसिद्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविंद्र जडेजा याचीही भेट घेतली. जडेजा आणि शमी यांनी या भेटीची छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध केली आहेत. या स्पर्धेत आम्ही चांगले खेळलो. पण अंतिम सामन्यात आम्ही कमी पडलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून आमच्या कक्षात येऊन आम्हाला धीर दिला. त्यांची भेट आमच्यासाठी विषेश आणि उत्साहवर्धक ठरली, असा संदेश रविंद्र जडेजाने ‘एक्स’ या प्रसार माध्यमावर भावपूर्ण छायाचित्रासह प्रसिद्ध केला आहे.
शमीकडून आभार
‘आम्ही ऐनवेळी कमी पडलो, हे खरे आहे. पण या प्रसंगी आम्हाला सर्व भारतीयांनी समर्थन देऊन धीर दिला आहे. विशेषकरुन पंतप्रधान मोदी यांनी आमच्या कक्षात येऊन आमच्याशी साधलेला संवाद आमचे मनोधैर्य वाढविणारा ठरला, असा संदेश छायाचित्रासह मोहम्मद शमी यानेही प्रसिद्ध केला आहे.
खेळाडूंनी करुन दिली भावनांना वाट
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या भारताच्या नवोदित खेळाडूंनी सोशल मिडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. ‘हा माझा पहिलाच विश्वचषक होता. या स्पर्धेने मला बरेच काही शिकविले. मला मिळालेल्या अनुभवाचा मला अभिमान आहे. माझे संघबंधू, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, सहाय्यक कर्मचारीवर्ग, संघव्यवस्थापन या साऱ्यांचा मी आभारी आहे. आम्हाला मनापासून पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचाही मी आभारी आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो’ असा हृदयस्पर्शी संदेश अय्यरने टाकला आहे.
अजूनही दु:खावेग आवरत नाही !
2011 मध्ये विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघातील खेळाडू आणि आताही संघाचा भाग असलेल्या रविचंद्रन अश्विननेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आमचा फार मोठा अपेक्षाभंग झाला आहे. पण या स्पर्धेने आम्हाला अनेक अविस्मरणीय क्षणही दिले. कोहली, शमी, रोहीत आणि बुमराह यांनी विशेष कामगिरी केली. असा संदेश प्रसिद्ध करताना त्याने ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदींचा भावोत्कट संदेश
‘प्रिय भारतीय संघा, या संपूर्ण स्पर्धेत तुझ्याकडून गाजविला गेलेला पराक्रम आणि प्रतिभेचे दर्शन, तसेच निर्धार प्रशंसनीय आहे. आपण खूप जोमाने खेळलो आणि भारताची प्रतिष्ठा अधिक वाढविली. आम्ही आज आणि सदासर्वकाळ भारतीय संघासमवेतच राहू’ असा संदेश पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ वर दिला आहे.