गुंजीतील ‘त्या’ जळीतग्रस्त घरातील कुटुंबीयांचे सांत्वन, आर्थिक मदत
गुंजी : गुंजीतील शंकर घाडी यांच्या घराला रविवारी आग लागल्याने त्यांचे संपूर्ण घर जळून भस्मसात झाले होते. त्यामुळे सदर कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन ते बेघर झाल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. या आशयाचे वृत्त ‘तरुण भारत“मधून सोमवारी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे अनेक महनीय व्यक्ती सदर कुटुंबीयांना येऊन भेट देऊन धीर देत सांत्वन करीत आहेत. त्याचबरोबर आर्थिक मदतही करीत आहेत. सोमवारी माजी आमदार अरविंद पाटील यांनी देखील या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर जळालेल्या घराची पाहणी करून वैयक्तिक दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन धीर दिला. तसेच शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी गुंजी पीकेपीएस कृषी बँकेचे चेअरमन प्रकाश गावडे, सातेरी माउली सोसायटीचे चेअरमन खेमाण्णा घाडी, सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे, नेताजी घाडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.