मानहानी प्रकरणात राहुल गांधींना सशर्त जामीन
प्रतिनिधी/ बेंगळूर
मानहानी प्रकरणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना बेंगळूरच्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तसेच पुढील सुनावणी 31 जून रोजी निश्चित केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना 1 जून रोजी झालेल्या सुनावणीवेळी जामीन मिळाला होता.
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने तत्कालीन राज्य भाजप सरकारविरोधात 40 टक्के कमिशनचा आरोप करणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या प्रकरणी राज्य भाजपचे तत्कालीन सचिव केशवप्रसाद यांनी 8 मे 2023 रोजी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. 1 जून रोजी या प्रकरणाची लोकप्रतिनिधींच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी स्वत: न्यायालयासमोर हजर राहून जामीन मिळविला होता. मात्र, राहुल गांधींनी न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळविली होती. परंतु, न्यायालयाने 7 जूनच्या सुनावणीवेळी राहुल गांधींनी स्वत: हजर रहावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार राहुल गांधी शुक्रवारी न्यायालयात हजर राहिले.
वकील निशानकुमार शेट्टी यांनी राहुल गांधींच्यावतीने युक्तिवाद करताना राहुल गांधी यांना जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.