आप नेते सत्येंद्र जैन यांना सशर्त जामीन
18 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
दिल्ली सरकारचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिला असून ते देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत. तसेच खटल्यावर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य त्यांना करता येणार नाही. आता कारागृहातून बाहेर पडण्यासाठी त्यांना 50 हजार ऊपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरावा लागेल, असे उच्च न्यायालयाने सांगितले. यापूर्वी वैद्यकीय स्थितीच्या आधारे 26 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जैन यांना 6 आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला होता. 11 जुलै हा त्यांच्या जामिनाचा शेवटचा दिवस होता.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने खटला लवकर संपण्याची शक्मयता दिसत नसल्याची टिप्पणी केली आहे. सत्येंद्र जैन यांनी सुमारे 18 महिने तुरुंगात शिक्षा भोगली आहे. त्यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असला तरी त्यांनी यापूर्वीच तुऊंगात दीर्घ शिक्षा भोगली असल्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. जैन 31 मे 2022 पासून कोठडीत होते. 6 एप्रिल 2023 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील केले. तेथून त्यांना 360 दिवसांनंतर 42 दिवसांसाठी जामीन मिळाला होता.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना मे 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. ईडीने 24 ऑगस्ट 2017 रोजी सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे जैन यांच्याविरुंद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात तपास सुरू केला होता. त्यांनी 14 फेब्रुवारी 2015 ते 31 मे 2017 या कालावधीत अनेक लोकांच्या नावे जंगम मालमत्ता खरेदी केली होती. या व्यवहारांमध्ये ते समाधानकारक हिशेब देऊ शकले नाहीत. या प्रकरणात पूनम जैन, अजित प्रसाद जैन, सनील कुमार जैन, वैभव जैन आणि अंकुश जैन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.