काँग्रेसशासित राज्यांची अवस्था वाईट : पंतप्रधान मोदी
झारखंडच्या गढवामध्ये जाहीर सभा : खोटी आश्वासने देऊन काँग्रेसकडून धूळफेक
वृत्तसंस्था/ गढवा
काँग्रेस आणि त्याचे सहकारी ज्या-ज्या ठिकाणी खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले, त्या राज्याला त्यांनी उद्ध्वस्त करून सोडले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीच काँग्रेस पक्ष खोटी आश्वासने देत असल्याचे मान्य केले आहे. काँग्रेसच्या या बेताल घोषणा संबंधित राज्यांना दिवाळखोरीकडे नेणार आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी झारखंडच्या गढवा येथे आयोजित सभेत बोलताना केला आहे.
स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसच्या राजकारणाचा मोठा आधार हा जनतेशी खोटे बोलणे, जनतेचा विश्वासघात करणे राहिला आहे. खोटी आश्वासने देऊन काँग्रेस मतदारांचा विश्वासघात कर तआहे. आमच्या नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. सध्या अफवा फैलावण्याचा मोठा उद्योग सुरू आहे. काही लोक अनेक गोष्टींचे दुकाने उघडून असून अफवा पसरवून माल विकत आहेत. जनतेने अशा कुठल्याही अफवांना बळी पडू नये असे उद्गार मोदींनी काढले आहेत. झारखंडची जनता इंडी आघाडीच्या सरकारला सत्तेवरून हटवत कमळ फुलविण्यास आतुर असल्याचे मोदी म्हणाले.
झारखंडच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
भ्रष्टाचार वाळवीप्रमाणे देशाला नुकसान पोहोचवत आहे. भ्रष्टाचार हा गरीब, दति, मागास आणि आदिवासींना सर्वाधिक दु:खी करतो. झारखंडने मागील 5 वर्षांमध्ये झामुमो-काँग्रेस-राजद सरकारने कशाप्रकारे भ्रष्टाचार केला हे पाहिले आहे. मुख्यमंत्री असो किंवा मंत्री, आमदार, खासदार या सर्वांना भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याचा दावा मोदींनी केला.
घराणेशाहीवर टीकास्त्र
झारखंडचा आणखी एक मोठा शत्रू हा घराणेशाही आहे. झामुमो-काँग्रेस आणि राजद ही तिन्ही पक्ष घोर घराणेशाही असलेले आहेत. या पक्षांसाठी स्वत:च्या परिवारापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही. हे पक्ष सामान्य लोकांची पर्वा करत नाहीत. अशा स्वार्थी पक्षांना चांगला धडा शिकविणे आवश्यक आहे. सत्तेची चावी केवळ याच परिवारांकडे राहावी अशी या लोकांची इच्छा आहे. चंपई सोरेन यांच्यासोबत झामुमोने काय केले हे सर्वांनी माहिती आहे. या लोकांनी एका आदिवासी पुत्राला अपमानित केल्याची टीका मोदींनी पेली आहे.
झामुमो-काँग्रेसकडुन युवांचा विश्वासघात
झारखंडच्या युवांमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. झारखंडची मुले आणि मुली क्रीडामैदानात स्वत:चे कौशल्य दाखवून देतात. झारखंडच्या युवांचे सामर्थ्य वाढावे, त्यांना नव्या संधी मिळाव्या ही राज्य सरकारची जबाबदारी असते, परंतु झामुमो, काँग्रेस आणि राजदने युवांसोबत विश्वासघात केला आहे. झामुमो-काँग्रेस सरकारने राज्यातील युवांना बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु याची पूर्तता झाली नाही. भरती प्रक्रियेत घोटाळा, पेपर लीक येथील उद्योग ठरला असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
गोगो दीदी योजनेचा उल्लेख
माता, भगिनी आणि मुलींच्या कल्याणासाठी झारखंड भाजपच्या संकल्पपत्रात अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. गोगो दीदी योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला माता-भगिनींना 2100 रुपये दिले जाणार आहेत. गरीब परिवाराच्या माताभगिनींना यापूर्वीच उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे, आता राज्यात भाजप सरकार आल्यास 500 रुपयांमध्ये सिलिंडर पुरविणार आहे. याचबरोबर पुढील वर्षी रक्षाबंधन आणि दिवाळीवेळी दोन मोफत सिलिंडर प्रदान करण्यात येतील असे मोदींनी सभेला संबोधित करताना म्टले आहे.
रोटी-बेटी-माटी की पुकार...
झारखंडमध्ये सध्या सर्वत्र ‘रोटी-बेटी-माटी की पुकार, झारखंड में भाजप-एनडीए की सरकार’ असा आवाज घुम आहे. पूर्ण देश विकसित भारताच्या संकल्पासह पुढे जात असताना झारखंडमध्ये ही निवडणूक होत आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा झारखंडला 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. भाजप झारखंडची सुविधा, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धीच्या हमीसोबत निवडणुकीच्या मैदानात उतरला असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.