गोवावेस येथील खोदाईवर काँक्रिटीकरणाच्या कामाला प्रारंभ
चरी बुजवल्या जात असल्याने वाहनचालकांतून समाधान
बेळगाव : गोवावेस येथे जलवाहिन्या घालण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी खोदाई करण्यात आली होती. रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूपर्यंत मुख्य चौकातूनच खोदाई करण्यात आल्याने सध्या त्या ठिकाणी चर पडली होती. वाहनांचे अपघात होत असल्याने नागरिकांनी तक्रार केल्यानंतर एलअँडटी प्रशासनाला जाग आली आहे. शहरात जलवाहिन्या घालण्याचे काम प्रगतीपथावर आहे. गोवावेस येथील मुख्य चौकामध्ये पेव्हर्सचा रस्ता उखडून जलवाहिन्या घालण्यात आल्या. दोन महिन्यांपूर्वी संथगतीने हे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर माती व खडी टाकण्यात आली. परंतु, अवजड वाहनांमुळे माती व खडी बसल्यामुळे खड्डा तयार झाला होता. रात्रीच्या वेळी हा खड्डा निदर्शनास न आल्याने अपघात होत होते. नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर बुधवारी रात्रीपासून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने हे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.