येळ्ळूर येथे दोन महिन्यातच गटारीचे काँक्रीट कोसळले
निकृष्ट कामाचा नागरिकांना फटका : चौकशीची मागणी
बेळगाव : येळ्ळूर गावच्या वेशीवर असलेल्या शिवसेना चौकातील गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. केवळ दोन महिन्यातच गटारीवर घालण्यात आलेले काँक्रीट कोसळल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. येळ्ळूर ग्राम पंचायतीतील काही सदस्यांनी मागील आठवड्यात गैरव्यवहाराचे प्रकरण लावून धरले होते. त्यातच आता निकृष्ट प्रतीच्या कामामुळे ग्राम पंचायतीवर टिकेची झोड उठविली जात आहे. काँक्रीट कोसळले असून नागरिकांना ये-जा करणेही धोक्याचे ठरू लागले आहे. रात्रीच्यावेळी सायकल चालकांना या ठिकाणी अपघातही होत आहेत. तसेच लहान मुलांनाही कोसळलेले काँक्रीट जीव घेणे ठरत आहे.
निकृष्ट प्रतीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
शिवसेना चौकात बँक तसेच इतर कार्यालय असल्यामुळे नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गावातील इतर भागातही अशाच प्रकारे निकृष्ट प्रतीचे काम केल्याने या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. कंत्राटदारांनी निकृष्टप्रतीचे साहित्य बांधकामावेळी वापरल्यामुळेच असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.