For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रंथाची फलश्रुती

06:14 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रंथाची फलश्रुती
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज ह्या ग्रंथाचा सविस्तर तपशील आता देत आहेत. ग्रंथाचा आरंभ कुठे झाला, तो पूर्ण कुठे झाला ह्याबद्दल सांगताना म्हणाले, ह्या ग्रंथाचा आरंभ प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे झाला. तेथे पाच अध्यायाचे निरुपण पूर्ण झाले. उरलेल्या ग्रंथाची रचना आनंदवनात म्हणजे वाराणसीत विस्तारली आहे. ह्याबद्दल अशी कथा सांगतात की, मराठीत कुणीतरी भागवतावर लिहित आहे हे समजल्यावर काशीतील पंडितांना अतिशय राग आला आणि त्यांनी नाथांना जेव्हढा लिहून झाला आहे तेव्हढा ग्रंथ घेऊन काशीला बोलावले. त्यांनी त्या लिखाणाचा अभ्यास केला. त्यांना ते लिखाण पसंत पडले आणि त्यांनी नाथांना पुढील अध्यायावर टीका लिहिण्यास प्रोत्साहन दिले.

वाराणसीबद्दल सांगताना नाथमहाराज म्हणतात, ‘अविमुक्त’ ‘महास्मशान’ ‘वाराणसी’ ‘आनंदवन’ ही सर्व वाराणसीचीच नावे आहेत. तिला अविमुक्त असे म्हणतात कारण तेथे मृत्यू आल्यास नक्कीच मुक्ती मिळते. स्मशानात प्राण सांडल्यावरती पुढे मसणात जावे लागत नाही. म्हणून ह्या वाराणसीला ‘महास्मशान’ असे म्हणतात. येथे शेवटी स्वत: शिव ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. ह्या ठिकाणाला श्वेत ‘वरुणा’ ‘अशी’ मर्यादा असून मध्ये पंचक्रोशी नांदते. म्हणून ह्याला वाराणसी असं म्हणतात. हे विश्वेश्वराचे क्रीडास्थान असून येथे स्वानंदे शिव क्रीडा करत असल्याने ह्या ठिकाणाला आनंदवन असेही म्हणतात.

Advertisement

हे स्थान एव्हढे पवित्र आहे की, इथे अमर झालेला जरी एखादा आला तरी येथले पावित्र्य पाहून आपल्याला मरण येथेच यावे असे त्याला वाटते. येथे जिवंतपणी सद्विचारांचे अन्न मिळते आणि मृत्यूनंतर हमखास मुक्ती मिळते असे पार्वतीपती सदाशिवाने सांगून ठेवले आहे. अशा ह्या वाराणसी मुक्तिक्षेत्री मणिकर्णिकेच्या महातीरावर पंचमुद्रापीठामध्ये एकादशावर टीका पूर्ण झाली. ती ऐकून सज्जन समाधानी झाले. स्वानंदाने जनार्दनस्वामी संतुष्ट झाले. पाच अध्याय पूर्ण झाल्यावर ते स्वत: म्हणाले, ग्रंथाची यथार्थ सिद्धता होईल. ह्या ग्रंथाचे कुणाला कसे फळ मिळेल हे सांगताना श्री जनार्दनस्वामी म्हणाले, जे ज्ञानी आहेत ते सुखी होतील, मुमुक्षु परमार्थ पावतील आणि साधकही भवसिंधु तरून जातील.

जे साधेभोळे विषयात रममाण होणारे लोक ह्या ग्रंथातील तत्वज्ञान श्रवण करतील, त्याचे वाचन करतील ते हरिभक्त होतील आणि सन्मार्गाला लागतील. ही टीका मराठीत जरी असली तरी ह्यातून जे ज्ञानदान होईल ते लाठीसारखे काम करेल. ह्याप्रमाणे ग्रंथाची फलश्रुती सांगून जनार्दनस्वामींनी सगळ्यांच्याकडे कृपादृष्टीने पहिले. स्वामी प्रसन्न आहेत हे बघून मीही त्यांना विनंती केली की, जे हा ग्रंथ काही उद्देशाने वाचतील त्यांना ब्रह्मभावे अनन्य भक्ती प्राप्त होऊन त्यांच्या मनात नामाबद्दल अखंड प्रेम निर्माण होईल असा वर द्यावा. त्यांनी कुणाचाही द्वेष करू नये. त्यांनी कुणाचीही निंदा करू नये. जे दुसऱ्याची निंदा करतात ते सर्वप्रकारच्या पापाचे धनी होतात. माझी ही विनंती ऐकून तुष्ट झालेल्या सद्गुरुंनी अत्यंत कृपादृष्टीने माझ्याकडे पाहिले.

ते म्हणाले, तू जे जे मागितले आहेस ते ते सर्व दिले असे समज. ह्या ग्रंथावर ज्यांची अनन्य भक्ती जडेल. कुणाची निंदा करावी, कुणाचा द्वेष करावा असे त्यांच्या मनातसुद्धा येणार नाही कारण निंदा आणि द्वेष त्यांच्या वाऱ्यालासुद्धा उभे राहणार नाहीत. तसेच त्यांना रामनामाचे प्रेम वाटायला लागून दिवसेंदिवस त्यांचे रामनामावरील प्रेम निश्चितपणे वाढतच राहील असाही वर मी देतो. त्यांची अविद्या नष्ट होऊन ब्रह्मभाव वाढत जाऊन त्यांची अनन्य भक्ती वाढत गेल्याने त्यांना निश्चितच ब्रह्मप्राप्ती होईल. असे वरदान देऊन जनार्दनस्वामींनी मला हृदयाशी धरून आलिंगन दिले.

क्रमश:

Advertisement
Tags :

.