जुने गोवेत शवदर्शन सोहळ्याचा समारोप
पवित्र अवशेष आज नेणार बॅसिलिका चर्चमध्ये
प्रतिनिधी/ पणजी
जुने गोवेत सुरू असलेल्या फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शन सोहळ्याचा शनिवारी समारोप करण्यात आला. तब्बल 45 दिवसांसाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आज रविवारी सकाळी अंतिम प्रार्थना (सोलमन मीस) सभा होणार असून त्याद्वारे या दशवार्षिक सोहळ्याचा खऱ्या अर्थाने समारोप होणार आहे.
शवदर्शन सोहळा समितीचे निमंत्रक फा. हेन्री फाल्कांव यांनी ही माहिती दिली.
आज सकाळी 9.30 वाजता फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र अवशेष मिरवणुकीने से कॅथेड्रल चर्चमधून बा जिझस बॅसिलिका चर्चमध्ये नेण्यात येतील. त्यावेळी निवडक निमंत्रित सहभागी होणार आहेत. त्यानंतर आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांच्या नेतृत्वाखाली प्रार्थना सभा होईल. त्यानंतर दर्शन सोहळा संपुष्टात येणार आहे.
गत दि. 21 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू झाला होता. या कालावधीत सुमारे 80 लाख भाविकांनी पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले, अशी माहिती फा. फाल्कांव यांनी दिली.
यंदाच्या सोहळ्यानिमित्त मुबलक पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रामगृहे (भाविक गाव), पार्किंग जागेपासून चर्चपर्यंत येण्यासाठी विशेष बग्गी वाहने, व्हील चेअर, यासारख्या अनेक सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. त्याद्वारे हा सोहळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचे प्रयत्न झाले होते. प्रारंभी या सोहळ्यास किमान 50 लाख भाविक येतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र विविध सोयी सुविधा, खास ‘लाईट आणि म्युझिक शो’ सारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन यामुळे ती संख्या सुमारे 80 लाखांवर पोहोचली, असे फाल्कांव म्हणाले.