For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांच्या सुरक्षेवरून चिंता : आप

06:43 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांच्या सुरक्षेवरून चिंता   आप
Advertisement

एक आठवड्यात शासकीय निवासस्थान सोडणार केजरीवाल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर अरविंद केजरीवाल आता शासकीय निवासस्थान सोडणार असून शासकीय सुविधांचा त्याग करणार असल्याची माहिती आप खासदार संजय सिंह यांनी बुधवारी दिली आहे. केजरीवाल एका आठवड्यात शासकीय निवासस्थान रिकामी करणार आहेत. अनेकदा हल्ल्यांना तेंड देऊनही केजरीवाल हे सरकारी सुरक्षा सोडतील असा दावा संजय सिंह यांनी केला आहे.

Advertisement

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीची जनता अत्यंत दु:खी आणि त्रस्त आहे. अरविंद केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यावरही जनतेच्या न्यायालयात अग्निपरीक्षा देण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता जनताच त्यांच्या प्रामाणिकपणावर मोहोर उमटविणार असून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करेल असे संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

मंगळवारी पदाचा राजीनामा दिल्यावर केजरीवालांनी सुरक्षा समवेत एका मुख्यमंत्र्याला मिळणाऱ्या सर्व सुविधा सोडण्याचा आणि लोकांदरम्यान एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अनेक हल्ले झाले आहेत. माझे रक्षण ईश्वरच करेल, मी 6 महिने तुरुंगात क्रूर गुन्हेगारांदरम्यान राहिलो आहे, तेव्हा देवानेच माझे रक्षण केले आणि आताही देवच वाचविणार असल्याचे केजरीवालांचे सांगणे असल्याचा दावा आप नेत्याने केला.

केजरीवाल पदावर नसतील तर जनतेला मिळणारी मोफत वीज-पाण्याच्या सुविधेचे काय होणार याचा विचार दिल्लीवासीयांनी करावा. मुलांना शासकीय शाळेत मिळणाऱ्या उत्तम दर्जाच्या शिक्षणाचे काय होणार? सरकारी रुग्णालये आणि मोहल्ला क्लीनिकांमध्ये मिळणारा मोफत उपचार आणि औषधांचे काय होणार? महिलांना मिळणारी मोफत बस प्रवासाची सुविधा आणि वृद्धांच्या मोफत तीर्थयात्रेच्या सुविधेचे काय होणार? केजरीवाल हे पुन्हा प्रचंड बहुमतासोबत मुख्यमंत्री झाले नाहीत तर भाजप जनतेला मिळणाऱ्या अनेक सुविधा बंद करणार असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. केजरीवालांनी मंगळवारीच दिल्लीच्या मुख्यंमत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ज्यानंतर आतिशी यांनी पक्षाच्या वतीने नवे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला होता.

दिल्लीचा एकच मुख्यमंत्री, केजरीवाल : आतिशी

दिल्लीचा एकच मुख्यमंत्री असून त्याचे नाव अरविंद केजरीवाला आहे. मागील दोन वर्षांपासून भाजपने केजरीवालांच्या विरोधात अनेक षडयंत्र रचली, भाजपने भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत केजरीवालांना तुरुंगात डांबले. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यावर केजरीवालांनी राजीनामा देत जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे लोक केजरीवालांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी पाहू इच्छितात असा दावा आतिशी यांनी केला आहे. केजरीवालांनी माझ्यावर इतका विश्वास दाखविल्याने मी आनंदी आहे. परंतु माझ्या मनात जितके सुख आहे, त्याहून अधिक मनात दु:ख असल्याचे वक्तव्यही आप नेत्या आतिशी यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.