निवडक सरकारी माध्यमिक शाळांमध्ये कॉम्प्युटर लॅब
31 जिल्ह्यांतील 178 शाळांची निवड करण्याची सूचना
बेंगळूर : शालेय शिक्षण आणि साक्षरता खाते तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षातील टेक्निकल असिस्टेड लर्निंग प्रोग्राम अंतर्गत राज्यातील 31 जिल्ह्यांतील निवडक 178 माध्यमिक शाळांमध्ये ‘मॉडेल कॉम्प्युटर लॅब’ स्थापन करण्यास सरसावले आहे. राज्याच्या शिक्षण संशोधन व प्रशिक्षण विभाग या संदर्भात कार्यवाही करत मोठ्या संख्येने विद्यार्थी असलेल्या सरकारी माध्यमिक शाळांना स्वतंत्र खोल्या असलेल्या व संगणक प्रयोगशाळा नसलेल्या शाळांची निवड करून तातडीने यादी पाठविण्याचे निर्देश डाएटच्या प्राचार्यांना दिले आहेत.
राज्यातील 35 शैक्षणिक जिल्ह्यांपैकी निवडक 23 जिल्ह्यांतील प्रत्येकी 6 शाळा आणि आठ जिल्ह्यांतील प्रत्येकी 5 शाळा निवडण्याची सूचना करण्यात आली आहे. बेंगळूर उत्तर, बेंगळूर दक्षिण, बेंगळूर ग्रामीण, बागलकोट, बेळगाव, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, मंगळूर, धारवाड, गदग, हासन, कोप्पळ, कोलार, म्हैसूर, शिमोगा, शिरसी, तुमकूर, उडुपी, विजापूर, विजयपूर आणि यादगिरी या सहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 6 माध्यमिक शाळांसाठी कॉम्प्युटर लॅब मंजूर झाले आहे. तर चामराजनगर, कलबुर्गी, बिदर, रायचूर, मधुगिरी, कोडगू, कारवार, विजयनगर या जिल्ह्यांतील प्रत्येकी 5 शाळांना संगणक मंजूर झाले आहेत.