हद्दवाढीबाबत आठ दिवसांत व्यापक बैठक
कोल्हापूर :
कोल्हापूर हद्दवाढीबाबत महायुती सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. मात्र स्थानिक पातळीवर हद्दवाढीस विरोध आहे. आपल्यात असणारी मत मतांतरे दुरुस्त करण्यासाठी येत्या आठ दिवसांमध्ये हद्दवाढीशी संबंधित सर्वच लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक घेऊ असे आश्वासन रविवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृति समितीस दिले. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करवीर आणि दक्षिणमुळेच रखडल्याचा गंभीर आरोप कृती समितीच्या सदस्यांनी केला.
कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृती समिती आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची रविवारी शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2014 मध्येच हद्दवाढीचा अद्यादेश काढला होता, मात्र ग्रामीण भागातील विरोधामुळे प्राधीकरण नेमण्यात आले. परंतु आता प्राधिकरणच एक समस्या बनली आहे. आजच्या बैठकीला सर्व खासदार, आमदार यांना बोलाविणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. यामुळे सर्वाना एकत्र घेऊन आपल्यातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा विचार करुन निर्णय घेणे योग्य ठरणार आहे.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, कोल्हापूर महापालिकेच्या स्थापनेपासून शहराची हद्दवाढ झालेली नाही. शहराची लोकसंख्या मात्र वाढत आहे. लोकसंख्येच्या निकषामध्ये बसत नसल्यामुळे केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीसह विविध योजनांचा लाभ महापालिकेला मिळत नाही. यामुळे महापालिकेवर आर्थिक ताण येत असून, हद्दवाढ करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पवार म्हणाले, हद्दवाढीसाठी गेल्या 50 वर्षापासून आंदोलन सुरु आहे, मात्र काहीच आउटपुट मिळालेला नाही. यामुळे आता शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी केली. बाबा पार्टे म्हणाले, काही वर्षापासून नुसत्या बैठकाच सुरु आहेत. अनेक मंत्री, पालकमंत्र्यांनी केवळ आश्वासने देण्याचे काम केले आहे. आता याबाबत ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. राज्यसरकारने थेट निर्णय घेवून हद्दवाढीचा अद्यादेश जारी करावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच हद्दवाढीमध्ये कितीही गावे घ्या आमचा विरोध नाही पण शहराची हद्दवाढ करा अशी मागणी पार्टे यांनी केली.
क्रिडाईचे अध्यक्ष के. पी खोत यांनी महापालिकेच्या उत्पन्नापैकी 62 टक्के उत्पन्न केवळ आस्थापनेवर खर्च होत आहे. यामुळे शहराची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. हद्दवाढीमध्ये पहिल्या टप्प्यात 12 गावांचा समावेश करा, या 12 गावांचा मास्टर प्लॅन तयार करा त्यांना रस्ते, ड्रेनेजच्या सुविधा द्या मग उर्वरीत गावांना सामावून घेऊ अशी सूचना मांडली. चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, दररोज ग्रामीण भागातून हजारो नागरीक शहरात येतात. शहरातूनच त्यांना रोजगार मिळतो या लोकांचा हद्दवाढीस विरोध नाही आहे. मात्र गावातील काही राजकारण्यांचे राजकारण बंद होणार असल्यामुळे ते नागरिकांची दिशाभूल करत आहेत. कोल्हापूरवर अवलंबून असणाऱ्या गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश करावा अशी मागणी केली.
बाबा इंदुलकर म्हणाले, महापालिका स्थापनेवेळी शहराची लोकसंख्या 40 हजारांच्या जवळपास होती. तीच आता 7 लाखांपर्यंत पोहोचली आहे. महापालिकेची स्थिती नाजूक असूनही ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी मनपा 2 कोटी रुपयांचे नुकसान सोसून केएमटी सुविधा देत आहे. याचा विचार करुन हद्दवाढ तत्काळ करण्याची मागणी केली. प्रजासत्ताकचे दिलीप देसाई म्हणाले, सर्वात प्रथम राज्य शासनाने प्राधिकरण रद्द करण्याचा निर्णय घ्यावा म्हणजे हद्दवाढीमधील मोठा अडथळा दूर होईल. तसेच मनपा कर्मचाऱ्यांचा पगार राज्य सरकारने दिल्यास महपालिकेवरील बोजा कमी होऊन विकासकामांवर भर देता येईल अशी सूचना मांडली. आर्किटेक्चर असोसिएशनचे अजय कोराणे म्हणाले, प्राधिकरणाकडून काहीही होत नाही आहे. इचकरंजी, गडहिंग्लज यांची हद्दवाढ झाली, मात्र कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली असल्याचे सांगितले. अशोक भंडारी, दिलीप पवार, किशोर घाटगे, पद्मा तिवले यांनी सुचना मांडल्या.
- तर नगरपालिका करा...
ग्रामीण भागातील दबावाला बळी पडून हद्दवाढ थांबत असेल तर कोल्हापूर महापालिकेची नगरपालिका करा. नाही तर महापालिका बंद करुन टाका अशा संतप्त भावना कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मांडल्या.
- 12 गावांचा समावेश करा
कळंबा, पाचगांव, मोरेवाडी, कंदलगांव, उचगांव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मुडशिंगी, गांधीनगर - वळीवडे, गिरगांव, वाशी, वाडीपीर या 12 गावांना घेऊन हद्दवाढ करावी अशी मागणी क्रिडाईच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदनही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले.
- सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी हद्दवाढीबाबत कृती समितीने आजूबाजूच्या गावांचा गैरसमज दूर करण्याची सुचना केली होती. यानुसार कृती समितीचे पदाधिकारी एका गावात गेले असता, तेथील लोकांनी आगोदरच तयारी करुन ठेवली होती. आमच्या अंगावरील कपडे तेवढे काढायचे बाकी होते असे सांगितले. तर तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढीत कोणतेच गांव आले नाही तर कागल घेऊन हद्दवाढ करु असे सांगत कृती समितीची खिल्ली उडवल्याचे मत काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले.