माडखोल राज्यमार्गाच्या पूर्न: डांबरीकरणास चार दिवसात सुरुवात
माजी सरपंच संजय लाड यांचे उपोषण स्थगित
ओटवणे | प्रतिनिधी
सावंतवाडी- बेळगाव राज्य मार्गादरम्यान माडखोल येथील निकृष्ट राज्य मार्गाचे प्रलंबित पूर्न: डांबरीकरण येत्या चार दिवसात सुरू करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता यांनी दिल्याने माडखोल माजी सरपंच संजय लाड यांनी ग्रामस्थांसह मंगळवारी पुकारलेले उपोषण स्थगित केले.
माडखोल येथील प्रलंबित पूर्न: डांबरीकरणासह असुरक्षित महामार्गाबाबत संबंधित खात्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संजय लाड यांनी ग्रामस्थांसह सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या दालनात तात्काळ बैठक घेतली. यावेळी येत्या तीन दिवसात शुक्रवारी १० नोव्हेंबरपूर्वी या रस्त्याच्या पूर्न: डांबरीकरण कामास सुरुवात करण्याची ग्वाही प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाने दिली.
दरम्यान भाजपाचे आंबोली मंडळ तालुका अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनीही संबधित ठेकेदारासह बांधकाम खात्याच्या असंवेदनशील कारभाराबाबत राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्याचा इशारा दिला होता. त्याचीही सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेत या रस्त्याच्या पुन: डांबरीकरणासाठी तात्काळ हालचाली सुरू केल्या. मात्र आता तरी या महत्त्वाच्या राज्य मार्गाचे अंदाजपत्रकाप्रमाणे आणि टिकाऊ काम करण्याचा सल्ला रवींद्र मडगावकर यांनी बांधकाम खात्याला दिला आहे.