गाझा शहर पूर्ण रिकामी करा!
जेरूसलेम दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायल आक्रमक
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलच्या सैन्याने उत्तर गाझामध्sय सैन्य अभियानापूर्वी मंगळवारी सकाळी गाझा शहराला पूर्ण रिकामी करण्याचा इशारा दिला आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या लढाटईत शहराला पूर्णपणे रिकामी करण्यासाठी हा पहिला इशारा आहे. गाझामध्ये 30 उंच इमारतींना उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या इमारतींचा वापर हमास स्वत:च्या कारवायांकरता करत होता असा आरोप इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्ज यांनी केला. इस्रायलने दहशतवाद्यांचे कमीतकमी 50 टॉवर्स नष्ट करण्याची योजना आखली आहे. या टॉवर्सचा वापर हमासकडून केला जात असल्याचा दावा पंतप्रधान बेंजामी नेतान्याहू यांनी केला आहे. हमासने या इमारतींमध्ये स्वत:ची देखरेख प्रणाली स्थापन केल्याचे सांगण्यात येत आहे.
हमासच्या अंतिम बालेकिल्ल्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी इस्रायलच्या वाढत्या आक्रमणाच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे. इस्रायलने पॅलस्टिनींना गाझा शहराच्या काही हिस्स्यांमधून पलायन करत दक्षिण क्षेत्रातील निर्धारित मानवीय क्षेत्रात जाण्याची सूचना केली आहे. गाझा शहराच्या क्षेत्रात जवळपास 10 लाख पॅलेस्टिनी आहेत. परंतु या इशाऱ्यापूर्वी यातील अत्यंत छोटासा हिस्साच गाझा शहरातून स्थलांतरित झाला आहे.
जेरूसलेम दहशतवादी हल्ला
जेरूसलेमच्या रामोत जंक्शनवर सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले होते. यानंतर इस्रायलने पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सैन्य अभियान सुरू केले आहे. जेरूसलेम येथे 2 दहशतवाद्यांनी बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करत असलेल्या लोकांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला होता, तर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कारवाईत हे दहशतवादी मारले गेले होते.