For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रथम टप्प्यासाठी अर्ज सादरीकरण पूर्ण

06:55 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रथम टप्प्यासाठी  अर्ज सादरीकरण पूर्ण
Advertisement

102 मतदारसंघांमध्ये होणार 19 एप्रिलला मतदान, अर्जांची पडताळणी आज

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्यासाठी बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देशभरात 1 हजारांहून अधिक उमेदवारी अर्जांचे सादरीकरण झाले आहे. बुधवार हा या टप्प्यासाठी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. आज गुरुवारी अर्जांची पडताळणी करण्यात येणार असून शनिवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. प्रथम टप्प्यातील उमेदवारांची नेमकी संख्या शनिवारी संध्याकाळी 5 नंतर समजणार आहे.  प्रथम टप्प्यात एकंदर 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून तामिळनाडूच्या सर्व 39 मतदारसंघांचा, तसेच उत्तराखंडच्या सर्व 5 मतदारसंघांचा समावेश या 102 मतदारसंघांमध्ये करण्यात आला आहे. प्रथम टप्प्यातील अर्जांची नेमकी संख्या रात्री उशीरापर्यंत घोषित झाली नव्हती. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांच्या अनेक उमेदवारांनी ढोल, ताशांच्या गजरात मिरवणुकीने जाऊन अर्ज सादर केले आहेत.

Advertisement

तामिळनाडू आणि उत्तराखंड या राज्यांशिवाय अरुणाचल प्रदेश (2), आसाम (5), बिहार (4), छत्तीसगड (1), मध्यप्रदेश (6), महाराष्ट्र (5), मणिपूर (2), मेघालय (2), मिझोराम (1), नागालँड (1), राजस्थान (12), सिक्कीम (1), त्रिपुरा (1), उत्तर प्रदेश (8), पश्चिम बंगाल (3), अंदमान आणि निकोबार (1), जम्मू-काश्मीर (1), लक्षद्वीप (1) आणि पुदुच्चेरी (1) ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात मतदान होत आहे. सर्व टप्प्यांची मतगणना 4 जूनला होणार आहे.

आसाममध्ये 38 अर्ज

प्रथम टप्प्यात आसामच्या 14 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. अर्ज सादरीकरणाच्या शेवटच्या दिवशी या 5 मतदारसंघांमध्ये एकंदर 38 अर्ज सादर झाले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात खरी चुरस आहे. छत्तीसगडच्या बस्तर मतदारसंघात 12 अर्ज सादर झाले आहेत. येथेही याच दोन पक्षांमध्ये स्पर्धा आहे. उत्तर प्रदेशच्या पिलिभित मतदारसंघातून जितीन प्रसाद यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

अण्णामलाई यांचा अर्ज सादर

तामिळनाडूच्या कोईम्बतूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. द्रमुकचे ए. राजा यांनीही कोईंबतूरमध्ये अर्ज सादर केला आहे. त्याचप्रमाणे दयानिधी मारन आणि द्रमुकच्या अनेक उमेदवारांनीही अर्ज सादर केले. त्रिपुरा (पश्चिम) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे बिल्पव देब यांनी अर्ज सादर केला आहे.

विविध राज्यांमध्ये चित्र भिन्न

प्रथम टप्पा हा मतदारसंघांच्या संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या विविध राज्यांमधील राजकीय समीकरणे भिन्न भिन्न आहेत. तामिळनाडूत मुख्य संघर्ष द्रमुक, अण्णाद्रमुक, भारतीय जनता पक्ष आणि इतर छोटे प्रादेशिक पक्ष यांच्यात आहे. काँग्रेसने द्रमुकशी युती करुन आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर भारतीय जनता पक्षाने पटली मक्कळ काची (पीएमके) या पक्षाशी युती केली आहे. हा पक्ष 10 जागांवर स्पर्धेत असून भारतीय जनता पक्षाने  29 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार निवडणुकीच्या स्पर्धेत उतरविले आहेत. उत्तर प्रदेशात प्रमुख संघर्ष भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यात आहे. तर बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची आघाडी यांच्यात थेट स्पर्धा आहे. उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा आहे.

प्रचाराला रंग रविवारपासून

प्रथम टप्प्यातील मतदारसंघांमधल्या प्रचाराला खरा रंग येत्या रविवारपासून भरणार आहे. कारण शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर स्पर्धेचे चित्र स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हेच प्रमुख राष्ट्रीय पक्ष असून इतर प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि आसाममध्ये प्रमुख स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये आहे. राजस्थानातही हेच दोन पक्ष एकमेकांशी संघर्ष करीत आहेत.

Advertisement
Tags :

.