पाणी पुरवठ्यासंदर्भातील कामे तातडीने पूर्ण करा
खासदार जगदीश शेट्टर यांची मनपा आयुक्तांना सूचना
बेळगाव : बेळगाव शहरात पाणी पुरवठ्यावरून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी एलअँडटी कडून सुरू असलेली कामे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने याबाबतची विकासकामे तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांना केली आहे. मंगळवारी काडा कार्यालयात झालेल्या बैठकीत मनपा आयुक्तांना सूचना करण्यात आल्या. शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनी घालण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. अनेक दिवस उलटूनही ही कामे पूर्णत्वाला गेलेली नाहीत. याबाबत अनेकवेळा महानगरपालिकेच्या बैठकामध्ये नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी रखडलेली सर्व कामे पूर्णत्वास न्यावीत, अशा सूचना त्यांनी मनपा आयुक्तांना दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.