मिऱ्या बंधाऱ्यांचे काम तातडीने पूर्ण करा
रत्नागिरी :
शहरानजिकच्या मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या 1200 मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक राहिलेला आहे. जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असताना पांढरा समुद्र मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याची पाहणी करून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधारा 190 कोटी खर्चून उभारण्यात येत आहे. मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या 1200 मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. पत्तन विभागाने काही दिवसांपूर्वी ठेकेदाराची बैठक घेतली होती. लवकरात लवकर उर्वरित टप्प्याचे आणि बंधाऱ्याच्या टॉपचे काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या होत्या. संबधित ठेकेदार कंपनीकडून अजूनही रखडलेल्या कामाला गती मिळालेली नाही. मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे. परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे.
सुमारे साडेतीन किमी लांबीचा हा बंधारा आहे. त्यापैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे. या बंधाऱ्याचे उर्वरित काम तातडीने पूर्णत्वास जाण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दुपारी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांसवेत पाहणी केली. येथील कामाचा आढावा घेतला. हा बंधारा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो जनतेसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यानिमित्ताने मंत्री उदय सामंत ह्यांनी सांगितले.