बहुग्राम पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांची सूचना : विकास आढावा बैठक
बेळगाव : बहुग्राम पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या विकास आढावा बैठकीमध्ये सूचविलेल्यानुसार बहुग्राम योजनेचे काम उत्तमरितीने सुरू असून बेळगाव विभागात चार व चिकोडी विभागात आठ कामे सुरू आहेत. या कामामध्ये काही समस्या उद्भवल्यास विविध खात्यातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सोडवाव्यात. योजनेच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही याची दखल घ्यावी, अशी सूचना जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. जि. पं. सभागृहात शुक्रवार दि. 8 रोजी बेळगाव व चिकोडी विभाग ग्रामीण पाणीपुरवठा-मलनिस्सारण खात्याची प्रगती आढावा बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते. बेळगाव विभागात अवरादी, देगांव, यरझर्वी व हालभावी आणि चिकोडी विभागात सत्ती, केंपट्टी, बिरनाळ, मेळवंकी, अप्पाचीवाडी, दड्डी, पाच्छापूर येथे सुरू असलेल्या योजनेच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.
कामात आणखी प्रगती साधण्याच्यादृष्टीने कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचनाही शिंदे यांनी केली. तसेच बहुग्राम पाणीपुरवठा योजनेच्या कामात वन, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे या खात्यांच्या मंजुरीबाबत चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशी दूरवाणीवरून संपर्क साधत कामाला गती द्यावी, असे सांगितले. चिकोडी विभागातील अप्पाचीवाडी, केंपट्टी बहुग्राम पाणीपुरवठा योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास कामाची निविदा रिस्क अँड कास्ट तत्त्वावर रद्दबातल करण्यात येईल, असा इशाराही कंत्राटदारांना शिंदे यांनी दिला. जि. पं. चे योजना संचालक रवी बंगप्पनवर, कार्यकारी अभियंता शशिकांत नायक, चिकोडी विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग राव, एस. बी. कोळी तसेच हेस्कॉम, उपवन, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेळगाव व चिकोडी विभागाचे अभियंते, नैर्त्रुत्य रेल्वे विभागाचे अधिकारी बेळगाव व चिकोडी बहुग्राम पाणी योजनेचे कंत्राटदार आदी बैठकीला उपस्थित होते.