प्रगतीपथावरील कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा
आमदार राजू कागे यांचे आवाहन : जिल्हा पंचायत कार्यालयात स्वतंत्र विकास आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : सरकार विविध कामांसाठी पुरेसा निधी देत आहे. या निधीतून जारी केलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून प्रगती साधावी, असे आवाहन वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन निगमचे अध्यक्ष व कागवाडचे आमदार राजू कागे यांनी केले. मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या स्वतंत्र विकास आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. गुणात्मक शिक्षण वाढविण्यासाठी जिल्ह्यात शैक्षणिक उपक्रम राबवावेत. मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी बैठका घ्याव्यात. रोहयो योजनेंतर्गत कामे पारदर्शकपणे करावीत. या योजनेंतर्गत शक्य असलेली कामेच हाती घ्यावीत. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत गरीब, अत्यंत गरीब व असुरक्षित गटांची ओळख पटवून त्यांना या योजनेत समाविष्ट करून घ्यावे, असेही ते म्हणाले. सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणाऱ्या निधीचा योग्य वापर करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधांची कमतरता भासू नये, याची दखल घ्यावी. एकसंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी त्वरित प्रयत्न व्हावेत. तेथे तज्ञ डॉक्टरांसह बालरोगतज्ञांची नियुक्ती करावी.
राज्य वित्त संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार महांतेश कौजलगी यांनी अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिकांची रिक्तपदे त्वरित भरण्यासाठी कार्यवाही हाती घ्यावी, असे सांगितले. जिल्ह्यात सरकारच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कामे योग्यरितीने होत आहेत की नाही याचा आढावा घेऊन कामे योग्य दर्जाची करून घ्यावीत. तसेच जिल्ह्यातील अबालवृद्धांपर्यंत सर्व योजना कशा पोहोचतील याबाबत उपाययोजना कराव्यात. शैक्षणिक, पंचायतराज, महिला व बालकल्याण, आरोग्य, सामाजिक वनविभाग, ग्रामीण विकास खात्यासह विविध विभागांनी बेळगाव हा जिल्हा राज्यात आदर्श बनविण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी केले. 2025-26 या शैक्षणिक वर्षात बेळगाव व चिकोडी जिल्ह्याचा दहावीचा निकाल वाढविण्याच्या दृष्टीनेही पावले उचलण्यात येत आहेत. अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग चालविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी मुलांच्या घरी भेट देण्यात येणार असून चौथ्या शनिवारी शाळेत पालकांची सभाही घेण्यात येणार आहे. एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी फोन इन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुख्य परीक्षेच्या धर्तीवर अंतर्गत परीक्षा घेतली जाणार आहे.
बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात चालू वर्षात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. कमी निकाल असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी एक दिवशीय कार्यशाळा व निकाल सुधारण्यासाठी विविध मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात विभागीय पातळीवर अभ्यासात मागे असलेल्या किंवा शिक्षणात आवड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गर्भवती महिलांचेही आरोग्य सुधारण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात एकूण 16030 स्त्रीशक्ती गट कार्यरत असून विविध योजनांचा लाभ घेत आहेत. बेळगाव जिल्ह्यात बालविकास योजनेंतर्गत 5656 अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. यापैकी 4172 स्वत:च्या इमारतीत तर 1484 भाड्याच्या इमारतीत केंद्रे चालविण्यात येत आहेत. चालू वर्षात 263 अंगणवाडी इमारती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 100 अंगणवाडी केंद्रांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
विविध विकासकामे हाती घेणार
पंचायतराज खात्याच्यावतीने 2025-26 सालात विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री विशेष विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास, टास्क फोर्स योजना, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे केंद्र निर्माण करणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूल व रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. काही ठिकाणी टेंडर प्रक्रियेद्वारे कंत्राटदारांना कामे देण्यात आली असून काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत आहे. अनुसूचित जाती-जमाती योजनेंतर्गत विधानसभा मतदारसंघात ग्रामीण रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध सरकारी रुग्णालयांमधील उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तालुका हॉस्पिटलमध्येही विविध कामे राबविण्यात येणार असून जिल्हा आरोग्य कार्यालय निर्माण करण्यात येणार आहे. चालू वर्षात आतापर्यंत 6054 मुलांना पोलिओ डोस, 6044 बीसीजी, 6883 गर्भवतींना टीटी लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 65 नम्म क्लिनिक मंजूर झाली असून सर्वाधिक गोकाक तालुक्यासाठी आहेत. यानंतर बेळगाव व चिकोडी तालुक्याला अनुक्रमे 10 तर खानापूर तालुक्याला 1 क्लिनिक मंजूर करण्यात आले आहे.
वनखात्याच्या विभागातील 10 केंद्रांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. खानापूर केंद्रातील हेब्बाळ नर्सरीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी खोली, साहाय्यक वनसंरक्षणाधिकारी उपविभागीय कार्यालय निर्माण करण्यात येणार आहे. रोहयोअंतर्गत 10 विभागांमध्ये पाझर तलाव, रोपांचे संवर्धन करण्याची उपाययोजना आखण्यात येत आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर 6 किलोमीटरपर्यंत आरसीसीची आगावू कामे करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपे वितरीत करण्यात येणार आहेत. राणी चन्नम्मानगरमध्ये निर्माण करण्यात येणारे ट्री पार्क अंतिम टप्प्यात आले असून सुमारे 309 किलोमीटरपर्यंत वृक्षारोपण करण्यात आले आहे.
रोहयो योजनेंतर्गत 2025-26 सालामध्ये रस्ते, गटारी, तलाव, अंगणवाडी इमारती, बागायत, रेशीम, कृषी, खेळाचे मैदान, शाळांतील शौचालये, ग्राम पंचायत बांधकाम, 36 ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचे केंद्र, 5 ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील क्षारपड जमिनीचे रुपांतर पिकावू जमिनीत करण्यात येणार आहे. 2025-26 सालामध्ये वसती व ग्रामीण विकास योजनेंतर्गत 1672 घरांची निर्मिती करण्यात आली असून 18602 घरे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 33247 घरांपैकी 531 घरे पूर्ण झाली आहेत. 2309 घरे प्रगतीपथावर असून 19813 घरांचे काम सुरू करण्यात आले आहे.
कर्नाटक ग्रामीण रस्ते विकासअंतर्गत जिल्ह्यात विविध कामे करण्यात येणार आहेत. काही कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी 45 कामे हाती घेण्यात आली आहेत. मत्स्योद्योग निर्मितीसाठी तलावांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया काढण्यात येणार असून याद्वारे कामे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विविध भागात 117 एकर जागेत 27 रेशीम प्रकल्प सुरू आहेत, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली. आमदार आसिफ सेठ व शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, विविध विभागांचे अधिकारी, सरकार नियुक्त सदस्य बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर अनुकंपा तत्त्वावर ग्राम पंचायतींमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेशपत्र देण्यात आले. तसेच तालुका संजीवनी योजनेंतर्गत एनआरएलएम कर्मचाऱ्यांना लॅपटॉप वितरण करण्यात आले.