For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्मार्ट सिटी’ची कामे त्वरित पूर्ण करा

12:15 PM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘स्मार्ट सिटी’ची कामे त्वरित पूर्ण करा
Advertisement

पणजीतील मतदारांना कोणताच त्रास होऊ नये : उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते यांचा आदेश

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, पणजी भागातील मतदारांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच मतदान केंद्रावर यायला त्यांना त्रास होऊ नये, यासाठी पणजीतील ‘स्मार्ट सिटी’चे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांना मतदान केंद्रात जायला अडचण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पणजी शहरात स्मार्ट सिटीचे काम सुऊ असूनही कोणत्याही मतदान केंद्रात बदल केला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. स्नेहा गीते बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल उपस्थित होते.

गैरप्रकार रोखण्यासाठी चोख व्यवस्था

Advertisement

येत्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली आहे. कोणतीही तक्रार आल्यास 100 मिनिटांत घटनास्थळी पोहोचून भरारी पथके कारवाई करतील. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील 20 विधानसभा मतदारसंघांत भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदार संख्या जास्त असणाऱ्या मतदारसंघात जास्त भरारी पथके देण्यात आली आहेत. या भरारी पथकात 3 ते 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय विभागीय अधिकारी तसेच तपासणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, असे गीते यांनी सांगितले. उत्तर गोव्यात 115 विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 16 तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तपासणी पथके राज्यातील महत्त्वाचे रस्ते, जंक्शन येथे काम करणार आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

वृद्धांना मतपत्रिकेद्वारे करता येईल मतदान

तसेच 85 वर्षांवरील मतदारांना मतपत्रिकेद्वारे मतदान करता येईल. मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर शेड उभारण्याचे काम सुऊ आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्राथमिक आरोग्य सेवेचे साहित्य ठेवण्यात येणार आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. उत्तर गोवा भागात येणाऱ्या सहा सीमांवरील तपासनाक्यांवर 24 तास पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मद्य तस्करी किंवा अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी येथे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे  उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले. सीआरपीएफ पोलीस एक कंपनी उत्तर गोव्यात दाखल झाली असून त्यांच्यासह गोवा पोलीस ठिकठिकाणी  फिरून तपासणी करीत आहेत, असेही कौशल म्हणाले.

गैरप्रकारांविरुद्ध तक्रार करण्यास नंबर

  • लँडलाईन              0832-2225383
  • भ्रमणध्वनी            9699793464
  • व्हॉट्स अॅप         9699793464
  • टोल फ्री क्रमांक   1950

निवडणूक प्रकियेचे वेळापत्रक

  • उमेदवारी अर्ज सुरु             19 एप्रिल 2024
  • अर्जांची छाननी                  20 एप्रिल 2024
  • अर्ज मागे घेण्याचा दिवस    22 एप्रिल  2024
  • मतदानाचा दिवस              7 मे 2024
  • मतमोजणी                       4 जून 2024

उत्तर गोवा मतदान व्यवस्था

  • एकूण मतदार       5 लाख 77 हजार 977
  • पुरुष                   2 लाख 80 हजार 260
  • महिला                 2 लाख 97 हजार 714
  • तृतीयपंथी मतदार   3

मतदान केंद्रांची व्यवस्था

  • मतदान केंद्रे          863
  • पिंक केंद्रे               20
  • ग्रीन मतदान केंद्रे  40
  • दिव्यांगस्नेही केंद्रे  5
Advertisement
Tags :

.