वैभववाडीतील गटारे व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा
पालकमंत्री नितेश राणेंच्या नॅशनल हायवेच्या अधिकारी व ठेकेदारांना सूचना
वैभववाडी । वार्ताहर
शहरातील नागरीक, प्रवासी यांची गैरसोय होता नये याची नगर पंचायत अधिकारी , पदाधिकारी व नॅशनल हायवे प्रशासनाने काळजी घ्या. पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे शहरातील गटार व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला त्रास होणार नाही असे काम करा. अशी सक्त सूचना मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत. तर पंधरा दिवसात शहरातील गटार व रस्त्याचे काम पूर्ण करू असे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपभियंता अतुल शिवनिवार यांनी यावेळी सांगितले.पहिल्याच पावसात वैभववाडी शहरातील गटारांच्या अर्धवट कामामुळे शहरात गटाराच्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले होते. याची दाखल घेत पालकमंत्री राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी वैभववाडी शहरातील प्रलंबित गटारांची पाहणी केली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, भालचंद्र साठे जयेंद्र रावराणे प्रमोद रावराणे नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे उपनगराध्यक्ष प्रदीप राव राणे प्राची तावडे, रणजीत तावडे संजय सावंत नेहा माईनकर, तसेच प्रांताधिकारी जगदीश काकीतकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, मुख्याधिकारी थोरात आदी उपस्थित होते. मागील पंधरा दिवसात सततच्या पावसामुळे शहरातील गटारे पाण्याने तुंबली होती त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर तरी वैभववाडीतील गटारांचा प्रश्न मार्गी लागणार का याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.