For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

11:15 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरातील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
Advertisement

स्वच्छतेची कामे त्वरित हाती घ्या : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना

Advertisement

बेळगाव : दोन दिवसांपूर्वी शहरासह तालुक्याच्या भागामध्ये वळीव पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरामध्ये वळीव पावसाच्या तडाख्याने अनेक भागात पाणी साचून घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेली अनेक विकासकामे रखडल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. यावरून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी याची गंभीर दखल घेत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व प्रलंबित विकासकामे पूर्ण करून उपाययोजना राबविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविली होती. यामध्ये जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तर वळीव पावसाच्या तडाख्याने शहरात निर्माण झालेल्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली. शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस वळीव पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे. जवळपास दोन तासांपेक्षा अधिककाळ पाऊस झाल्याने शहरातील नाल्यांमध्ये पाणी साचले होते. गटारी तुडुंब भरून रस्त्यांवरून वाहत होत्या. अनेक भागात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. सखल भागामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाल्याने घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे.

याबाबत वृत्तपत्रांमध्ये शहरातील परिस्थितीचा लेखाजोखा मांडला होता. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या विकासकामांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून विकासकामे झाली असली तरी अनेक ठिकाणी कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून रस्त्यांना तलावांचे स्वरूप आले होते. याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून पावसाळ्यापूर्वी नियोजित कामे पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. शहरामध्ये पावसाळ्यापूर्वी घ्यावी लागणारी आवश्यक कामे त्वरित राबविण्यात यावीत व पूर्वखबरदारी घ्यावी, अशी सूचना केली. जिल्ह्यामध्ये बेळगाव व खानापूर तालुक्यात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र इतर तालुक्यांत पाण्याची कमतरता असून पाणीटंचाई असणाऱ्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आवश्यक प्रमाणात निधी उपलब्ध आहे. निधीची कमतरता नाही. पाणी टंचाईग्रस्त गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांना केली. वळीव पाऊस सुरू झाल्याने लवकरच जिल्ह्यामध्ये पेरणीची तयारी केली जाणार असून कृषी खात्याने शेतकऱ्यांना आवश्यक असणारी बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत. यासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी तयारी करावी, अशी सूचना केली.

Advertisement

शेतकऱ्यांना सरकारकडून 316.52 कोटी वितरण

यावेळी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून उपलब्ध बी-बियाणे व रासायनिक खतांच्या साठ्याची माहिती देण्यात आली. पावसाअभावी पीकहानी झालेल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून 316.52 कोटी वितरण करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर निधी जमा करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

खबरदारीबाबत अधिकाऱ्यांना सूचना

वळीव पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वीची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत, स्वच्छतेची कामे त्वरित हाती घेण्यात यावीत, प्रलंबित विकासकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे.

- जिल्हाधिकारी, नितेश पाटील

Advertisement
Tags :

.