For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करा

08:05 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्री विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करा
Advertisement

पोलीस खात्याचे गणेशोत्सव मंडळांना आवाहन : सहकार्य करण्याची ग्वाही

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : गेल्यावर्षी श्री विसर्जन मिरवणूक तब्बल 36 तास चालली. यंदा ही वेळ कमी करण्यासाठी पोलीस दलाने धडपड सुरू केली आहे. सोमवारी विविध खात्यांचे अधिकारी व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. पोलीस दलाचे संपूर्ण सहकार्य असणार आहे, अशी ग्वाहीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

पोलीस आयुक्त प्रकाश निकम, उपायुक्त नारायण बरमनी, निरंजन राज अरस आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीत मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे विजय जाधव, शहापूर विभाग गणेशोत्सव महामंडळाचे नेताजी जाधव, माजी महापौर मालोजी अष्टेकर, रवी कलघटगी, रमेश सोंटक्की, सुनील जाधव, हेमंत हावळ आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

हेस्कॉम, महानगरपालिका, परिवहन मंडळ, महसूल विभाग, वनखाते, अग्निशमनसह विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरवणुकीची वेळ आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. शेवटच्या विसर्जनासाठीची चढाओढ, विसर्जन तलावावरील अनावश्यक विलंब आदींमुळे मिरवणूक लांबत चालली आहे. त्यामुळे सर्व मंडळांच्या पुढाकारातून ही वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. विसर्जन तलावावर केवळ पाच मिनिटांत श्रींची आरती करावी. त्यानंतर विसर्जन करावे. तलावावर एका मंडळाच्या केवळ दहा कार्यकर्त्यांना प्रवेश असणार आहे. मिरवणूक लवकर सुरू करून लवकरात लवकर भक्तीभावाने श्रीमूर्तींचे विसर्जन करावे. मिरवणुकीत सातत्य असावे. कारण मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झालेली असते. सलग व सातत्य राखल्यामुळे भाविकांना मिरवणुकीचा आनंद लुटता येणार आहे, असा सल्ला पोलीस अधिकाऱ्यांनी दिला.

डीजे व लेझर, प्लाझ्मा लाईट्सना परवानगी नसणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस दलाने ठरवून दिलेल्या डेसिबल व्यतिरिक्त आवाज वाढवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही पोलीस अधिकाऱ्यांनी दिला. मिरवणुकीच्या आत लोंबकळणाऱ्या तारा हटविण्याबरोबरच ख•s बुजविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. मिरवणुकीसाठी आणखी कोणत्या व्यवस्था करायला हव्यात, याचा सल्ला पदाधिकाऱ्यांनी दिला.

गणेशोत्सवासाठी 500 अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे

बैठकीनंतर पोलीस आयुक्त प्रकाश निकम म्हणाले, गेल्यावर्षी 36 तास मिरवणूक चालली आहे. विसर्जनाला होणाऱ्या विलंबामुळे तास वाढतो आहे. ही वेळ कमी करण्यासाठी गणेश मंडळांच्या सहकार्यातून प्रयत्न करण्यात येत आहेत. गणेशोत्सवासाठीच 500 अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आधीचे 600 कॅमेरे आहेतच. कोणत्याही परिस्थितीत उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी पोलीस दलाचे सहकार्य असणार आहे. मंडळांनीही वेळेत मिरवणूक सुरू करून व वेळेत विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

Advertisement
Tags :

.