For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा-मच्छे बायपास काँक्रिटीकरण ऑगस्टपर्यंत पूर्ण करा

12:57 PM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
हलगा मच्छे बायपास काँक्रिटीकरण ऑगस्टपर्यंत पूर्ण करा
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांची सूचना : रिंगरोड-महामार्गाबाबत अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक

Advertisement

बेळगाव : बेळगावमधील रिंगरोड, बायपास, बेळगाव-गोवा महामार्ग, बेळगाव शहरातील उड्डाणपूल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी खासदार जगदीश शेट्टर यांनी महामार्ग प्राधिकरण, नैर्त्रुत्य रेल्वे व विमानतळ प्राधिकरणाची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना सुनावत काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली. तसेच हलगा-मच्छे बायपासचे काँक्रिटीकरण ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बेळगावच्या रिंगरोडसाठी 80 टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित 20 टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम लवकरच देण्यात येईल. 12 गावांमधील 276 एकर जमिनीची नुकसानभरपाई बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित 58 कोटी रुपये न्यायालयाच्या खात्यात जमा केल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

वाघवडे आणि झाडशहापूर गावातील काही शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास सहमती दर्शविल्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बेळगुंदी ते नावगे या दरम्यानचे काम पूर्ण केले जाणार आहे. हलगा-मच्छे बायपासचे काँक्रिटीकरण वेगाने पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. बेळगाव-गोवा व्हाया अनमोड रस्त्यातील गुंजीजवळील 345 झाडे लवकरच तोडण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे या मार्गाचे काम वेगाने सुरू होणार आहे.

बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला या रस्त्यातील कुसमळी ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात असून मान्सूनपूर्वी तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. याबरोबरच खासदारांनी बेळगाव शहरात होणाऱ्या उड्डाणपुलाची माहिती घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक भुवनेश कुमार, भूसंपादन अधिकारी बलराम चौधरी, नारायण आर., राजश्री जैनापुरे, बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन यांसह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.