For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमानतळ विस्तारीकरणाचे काम त्वरित पूर्ण करा ! खासदार शाहू छत्रपती

03:57 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
विमानतळ विस्तारीकरणाचे काम त्वरित पूर्ण करा   खासदार शाहू छत्रपती
airport expansion work immediately MP Shahu Chhatrapati
Advertisement

विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना : भूसंपादनाच्या पुनर्वसनाबाबत तातडीने नियोजन करावे : आमदार ऋतुराज पाटील

गोकुळ शिरगाव वार्ताहर

Advertisement

कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणाचे काम लवकर पूर्ण करून नवीन हवाई मार्गावर विमानसेवा सुरु करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना खासदार शाहू छत्रपती यांनी केल्या. कोल्हापूर विमानतळावरून सुरू करण्यात येणाऱ्या नवीन विमानसेवेचा आढावाही त्यांनी घेतला.

कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीची 2024 या वर्षाची पहिली बैठक सोमवारी समितीचे अध्यक्ष खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ येथील हॉलमध्ये झाली. आमदार ऋतुराज पाटील, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत उपस्थिती लावली.

Advertisement

धावपट्टी विस्तारीकरण, नवीन हवाई मार्गावर विमानसेवा सुरु करणे, विमानतळावरील कार्गो सुविधा, महामार्ग ते विमानतळ रस्ता आणि पथदिवे, प्रवाशांना बस सुविधा पुरविणे, विमानतळ परिसरातील दोन गावांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी मुद्यांवर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

आमदार ऋतुराज पाटील यांनी विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादन पुनर्वसनाबाबत संबंधित विभागाने तातडीने नियोजन करावे, अशा सूचना केल्या. यावर कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी 64 एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तर विमान वाहतुकीस कचऱ्यामुळे होणारा अडथळा दूर करण्यासाठी येथील योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी पुणे येथील एका खासगी कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्या कंपनीच्या काही अटी आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या.

खासदार धैर्यशील माने यांनी विमानाने येणाऱ्या प्रवाशांकडून रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात भाड्याची दर आकारणी करत असून रिक्षा भाड्याबाबत विमानतळ प्रशासनाचे नियंत्रण असावे, अशी सूचना केली. तसेच विमानतळावरील कार्गो सुविधांसह कोल्हापूर ते शिर्डी, गोवा, नागपूर, अहमदाबाद जोधपूरकडे नियमित विमानसेवा करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, विमानतळाकडे महापालिकेची केएमटी बस सेवा सुरू करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र महापालिकेकडे केएमटी बसेस कमी असल्याने कोल्हापूर ते विमानतळ या मार्गावर बससेवा सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. यावर सल्लागार समितीचे तेज घाटगे यांनी पुढाकार घेऊन या मार्गावर एक खासगी बस देण्यासाठी पुढाकार घेतला. आरटीओ विभाग यांच्याशी तत्काळ दराबाबत चर्चा करून ही बस सुरू करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत केली.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., करवीर प्रांताधिकारी हरिश धार्मिक, सल्लागार समिती सदस्य व्ही. बी. पाटील, किरण पाटील, पार्थ नागेशकर, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे आदी उपस्थित होते.

महामार्ग-विमानतळ पथदिवे लावा : आमदार ऋतुराज पाटील
कोल्हापूर, नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला जोडण्याच्या भूसंपादनाबाबतही चर्चा करण्यात आली. या बायपास रस्त्यासाठी नव्याने पर्यायी मार्ग सुचवला आहे. त्यासाठी विमानतळाची 20 गुंठे जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन विमानतळाचे संचालक शिंदे यांनी दिले. राष्ट्रीय महामार्ग ते विमानतळ रस्त्यावर अंधार असतो. याठिकाणी पथदिवे लावण्यात यावेत, अशा सूचनाही आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या.

कोल्हापुरात होणार विमानाबाबत प्रशिक्षण
कोल्हापूर विमानतळावर विमानाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईतील एका खासगी कंपनीने प्रस्ताव दिला आहे. याबाबत सर्व बाबींची पूर्तता करून लवकरच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानुसार, 18 सप्टेंबरच्या दरम्यान याबाबत बैठक घेऊन विमानाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विमानतळाचे संचालक शिंदे यांनी दिली.

Advertisement
Tags :

.