For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड म्युझियमचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा!

10:11 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
नंदगड म्युझियमचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सूचना : संगोळ्ळी रायण्णा क्षेत्र विकास प्राधिकरणाची चौथी बैठक

Advertisement

बेंगळूर : खानापूर तालुक्यातील नंदगड येथे 75.29 कोटी रु. खर्चातून संगोळ्ळी रायण्णा म्युझियम निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याआधी सर्व कामे पूर्ण करावे. नंदगडमध्ये तलाव विकास आणि संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळा उभारण्याचे कामही याच कालावधीत पूर्ण करावे, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बेंगळूरमध्ये क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा क्षेत्र विकास प्राधिकरणाची चौथी बैठक झाली. संगोळ्ळी रायण्णा म्युझियमसाठी संरक्षक भिंत निर्माण करण्यासाठी आवश्यक अंदाजे खर्चाची यादी सादर करण्याची सूचनाही त्यांनी दिली. बैलहोंगल तालुक्यातील संगोळ्ळी येथे संगोळ्ळी रायण्णा सैनिक स्कूलच्या बांधकामासाठी 179.30 कोटी रुपयांच्या टेंडरला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या स्कूलचे काम जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित कामे महिनाभरात पूर्ण करा, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिली.

राज्यातील विद्यार्थ्यांना 67 टक्के राखीवता

Advertisement

अतिरिक्त 30 कोटी रुपये खर्चाच्या कामासंबंधी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना अहवाल सादर करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशात कर्नाटकातील विद्यार्थ्यांना 67 टक्के आणि  परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी 33 टक्के राखीवता निश्चित करण्यासंबंधी संरक्षण मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. कर्नाटकातील विद्यार्थ्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी पहिली इयत्तेपासून पाचवीपर्यंत व्हर्टीकल स्कूल सुरु करण्यासंबंधी विचार करावा. सैनिक शाळेत कायमस्वरुपी शिक्षक नेमणुकीचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली. प्राधिकरणाकडून संगोळ्ळी रायण्णा स्मारक विकासासंबंधी, सुविधा निर्माण करण्याचा ब्ल्यू प्रिंट सादर करण्याची सूचना मागासवर्ग कल्याणमंत्री शिवराज तंगडगी यांना दिली. बेळगावमधील अधिवेशनात यासंबंधी विचारविनिमय करून निर्णय घेणार असल्याचे सिद्धरामय्यांनी सांगितले. बैठकीला मंत्री शिवराज तंगडगी, भैरत सुरेश, गॅरंटी अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा आदी उपस्थित होते.

संगोळ्ळी गाव एक उत्तम पर्यटनस्थळ 

संगोळ्ळी गावातील संगोळ्ळी रायण्णा शौर्यभूमीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. हे एक उत्तम पर्यटनस्थळ बनत आहे. येथे पर्यटकांसाठी वाहन पार्किंग सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली. प्राधिकरणाच्या 2024-25 या वर्षातील 15.48 कोटी रुपयांच्या कृती आराखड्यालाही बैठकीत मंजुरी देण्यात आली. संगोळ्ळी रायण्णा सांस्कृतिक सल्लागार समिती नेमण्याचा प्रस्तावही सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.