For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा-बाची रस्ताकाम आठवड्यात पूर्ण करा

11:13 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा बाची रस्ताकाम आठवड्यात पूर्ण करा
Advertisement

अन्यथा रास्ता रोकोचा इशारा : मार्गावर खडी पसरल्याने दुचाकींच्या अपघातांच्या घटना : काम संथगतीने  सुरू असल्याने वाहनधारकांतून संताप

Advertisement

वार्ताहर/उचगाव

हिंडलगा-बाची, कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या कामाचा वेग संथगतीने असल्याने आणि सध्या या संपूर्ण मार्गावर खडी पसरविलेली असल्याने दुचाकी वाहने चालवणे मुश्किल झाले आहे. याबरोबरच धुळीचे लोट उठत असल्याने वाहनचालकांच्या डोळ्यात धूळ जात असल्याने वाहने चालवणे कठीण झाले आहे. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक राहती घरे, हॉटेल्स यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या आठवड्याभरात जर या रस्त्याचे काम पूर्णत्वाला गेले नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील प्रवासी आणि नागरिकांनी दिला आहे. यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी तातडीने ठेकेदारांना हे काम पूर्ण करण्यास भाग पाडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.बेळगाव-वेंगुर्ले हा मार्ग जवळपास तीन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. कर्नाटक-महाराष्ट्र आणि गोवा ही तीन राज्ये या मार्गाने जोडली जातात.

Advertisement

बेळगावहून निघाल्यानंतर कोवाडमार्गे महाराष्ट्रमध्ये जाण्यासाठी तसेच पुढे बाचीपासून शिनोळी महाराष्ट्रमध्ये आणि पुढे गोवा अशा तीन राज्यांना जोडणारा कर्नाटक-महाराष्ट्र आणि गोवा हा महत्त्वाचा दुवा बनला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून बेळगाव-वेंगुर्ले रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी अनेकवेळा निवेदने, आंदोलने, रास्ता रोको छेडण्यात आले. मात्र याकडे अद्याप दुर्लक्ष होत गेले. गेल्यावर्षीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. एक वर्ष होत आले. मात्र अद्याप म्हणावी तशी प्रगती या रस्त्याच्या दुरुस्तीची दिसून येत नाही. या मार्गावर पाहता रहदारीची तोबा गर्दी असते. चारचाकी गाड्या जाऊ शकतात. मात्र दुचाकीधारकांना रात्रीच्या अंधारातून पसरवलेल्या खडीतून ही वाहने कशी चालवावी हेच कळत नाही. खडीमध्ये दुचाकी वाहने घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये किरकोळ जखमा प्रवासीवर्गांना सहन कराव्या लागत आहेत. वाहन घसरून मोठी दुखापत झाली तर याला जबाबदार कोण, असाही संतापजनक प्रश्न प्रवासीवर्गातून विचारला जात आहे. हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर या भागातील अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रोज रोलिंग करून खडी बसवणे महत्त्वाचे

यासाठी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करणे. तसेच या रस्त्यावर रोज पाणी मारून प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ यावर पाणी मारून ती शमवणे गरजेचे आहे. तसेच रोज रोलिंग करून खडी बसवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर येत्या आठवड्यात या रस्त्याचे काम पूर्णत्वाला गेले नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतवडीत जाणारे काही अॅप्रोच रस्ते बनले खोलगट

हिंडलगा-बाची या मार्गाशी शेतवडीत जाणारे काही अॅप्रोच रस्ते आहेत. मुख्य रस्ता उंच झाल्याने शेतवडीत जाणारी रस्ते खोलगट भागात पसरल्याने या रस्त्यावरून ये-जा करणे ट्रॅक्टर, बैलगाड्या, उसाने भरलेली ट्रक या सर्व वाहनांना मुश्किल झाले आहे. यासाठी ठेकेदारांनी शेतवडीत जाणाऱ्या रस्त्यांनाही मार्ग मोकळा करून ये-जा करण्यासाठी मोकळे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.