‘जलजीवन’ची कामे वेळेत पूर्ण करून हस्तांतर करा
पाणीपुरवठा-मलनिस्सारण खात्याचे संचालक नागेंद्रप्रसाद के. यांची अधिकाऱ्यांना सूचना : जि. पं. सभागृहात बैठक
बेळगाव : जलजीवन मिशन योजनेची कामे करताना रस्त्यांची खोदाई झाल्यास कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते बुजवून ती वाहतुकीसाठी योग्य होण्याच्या दृष्टीने तयार करून द्यावीत. तसेच कामे वेळेत पूर्ण करून पंचायतींना हस्तांतरित करावीत, अशी सूचना ग्रामीण पाणीपुरवठा-मलनिस्सारण खात्याचे संचालक नागेंद्रप्रसाद के. यांनी केली. जि. पं. सभागृहात शुक्रवारी झालेल्या जलजीवन मिशन योजनेची कामे व बहुग्राम पाणीपुरवठा योजना विकास आढावा बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नळजोडणीची कामे बेळगाव जिल्ह्यात 90 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही वेळीच पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही नागेंद्रप्रसाद यांनी बेळगाव व चिकोडी विभागातील अधिकाऱ्यांना केल्या.
बेळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता किरण घोरपडे यांनी बेळगाव विभागात झालेल्या कामांची माहिती दिली. जिल्ह्यात एकूण 1235 गावे असून 2183 लोकवस्ती आहेत. बेळगाव विभागात 705 गावे असून 912 लोकवस्ती आहेत. 1 लाख 55 हजार 407 घरांना नळजोडणी आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 337 लोकवस्तींमध्ये 1 लाख 12 हजार 867 घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट असून 332 लोकवस्तींमध्ये काम पूर्ण करण्यात आले आहे. जलजीवन मिशन योजनेच्या चौथ्या टप्प्यात 42 कामांपैकी 450 घरांसाठी नळ संपर्क देण्याच्या कामाला अनुमोदन मिळाले असून 42 कामांसाठी आदेश दिले आहेत. यापैकी 29 कामे पूर्ण झाली असून 13 कामे प्रगतीपथावर आहेत, असे सांगितले. अवरादी येथील बहुग्राम पाणी योजना अंतिम टप्प्यात असून येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लोकार्पण होईल, अशी माहिती घोरपडे यांनी दिली.
चिकोडी विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग राव यांनी आपल्या विभागातील कामांची माहिती दिली. बेळगाव व चिकोडी विभागात 8 तालुके असून 517 गावांचा समावेश आहे. यामध्ये 4 लाख 47 हजार 338 घरे असून 15 ऑगस्ट 2019 पर्यंत 99 हजार 437 घरांना नळजोडणी झाली आहे. उर्वरित घरांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळजोडणी देण्यात येणार आहे. जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनीही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. ‘जलजीवन’ची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून ‘हर घर जल’ गावाची घोषणा करण्यात यावी. बेळगाव विभागात नव्याने चार बहुग्राम योजना राबविण्यात येणार असून एकूण चार बहुग्राम योजना अंमलात आणण्यासाठी 1444 कोटी रुपयांच्या कृती योजनेला अनुमोदन देण्यात आले आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा-मलनिस्सारण खात्याचे मुख्य अभियंता एजाज हुसेन, उपसचिव जाफरशरीफ सुतार, जि. पं. चे योजना संचालक रवी बंगारेप्पन्नवर यांच्यासह जिल्ह्यातील साहाय्यक कार्यकारी अभियंते, शाखाधिकारी, कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.