उचगाव भागात येणाऱ्या बसेसबाबत प्रवाशांच्या दिवसेंदिवस वाढत्या तक्रारी
स्थानकावर बस थांबवत नसल्याने प्रवासी, नागरिकांतून तीव्र संताप
वार्ताहर/उचगाव
बेळगाव बस डेपोच्या उचगाव भागात येणाऱ्या बसेसबाबत प्रवासीवर्गाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. बसचालक आणि वाहक यांचा मनमानी कारभार चालल्याच्या तक्रारी प्रवासी वर्ग आणि नागरिकांतून करण्यात येत आहेत. उचगाव भागामध्ये उचगाव, बसुर्ते, कोनेवाडी, बेकिनकेरे, अतिवाड या भागामध्ये या बसफेऱ्या असतात. अनेकवेळा रात्री वस्तीला येणाऱ्या आणि सकाळी या गावाहून सुटणाऱ्या अनेक बसेसमधील ड्रायव्हर मनमानी करतात. प्रवासी दिसत असताना देखील किंवा आपण बसमधून येणार असल्याचे हात उंचावून खुणावत असताना देखील बस ड्रायव्हर बस वेगाने चालवत असल्याने प्रवासी, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पहाटे उठून पहिली सहाची बस पकडण्यासाठी अनेक प्रवाशांची सातत्याने धडपड चालू असते. घरातून सर्व कामांची आवराआवर करत टिफिन बॉक्स घेऊन धावत बस स्थानकावर यावे लागते. तोपर्यंत बस समोरून जात असते. मात्र ड्रायव्हर बस थांबवत नाही. परिणामी प्रवासीवर्गाला दुसऱ्या वाहनाची तासन्तास वाट पाहत थांबावे लागते. शाळा, कॉलेजसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी बस चुकल्याने अभ्यासाचे तास चुकतात. कामगार वर्गाला कामावरती वेळेत न गेल्याने त्यांच्या अर्ध्या दिवसाची हजेरी भरली जात नाही. अर्ध्या दिवसाचा पगार मिळत नाही. याला पूर्णत: बस खाते जबाबदार आहे. यासाठी आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचगाव भागात ये-जा करणाऱ्या सर्व बस ड्रायव्हरना सूचना कराव्यात आणि असे प्रवासी दिसल्यानंतर बस थांबून त्यांना बसमध्ये घेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे.
बसथांबा पेट्रोल पंपवर की बसस्थानकात?
उचगाव आणि बसुर्ते या दोन गावांनाही रात्री वस्तीच्या बसेस येतात. उचगाव, बसुर्ते बसस्थानकात सदर बसेस न थांबवता एक किलोमीटर अंतरावरील उचगाव-बसुर्ते पट्ट्यातील पेट्रोल पंपवरती या बसेस रात्रभर थांबवल्या जातात आणि पहाटे सहा वाजता बसस्थानकात येतात आणि निघून जातात. यामुळे सदर बस आली की नाही याचा प्रवाशांना अनेकवेळा थांगपत्ताही लागत नाही. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा.
पाठलाग करत बस पकडावी लागली
मुलीला बसमध्ये बसविण्यासाठी रोज सकाळी सहाच्या पहिल्या बससाठी उचगाव बसस्थानकावरती जात असतो. मात्र सदर बस ड्रायव्हर बसस्थानकात आम्ही येत असल्याचे पाहूनदेखील तो वेगाने बस पुढे घेऊन जातो. सदर बसचा मी शुक्रवारी पाठलाग करत अखेर विजयनगरपर्यंत मला जावे लागले आणि बसमध्ये बसवावे लागले, अशाप्रकारची ही बस ड्रायव्हरची मनमानी कृपया थांबवावी.
- बाळासाहेब देसाई, उचगाव