For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गौतम खट्टरविरुद्ध राज्यभरात तक्रारी

03:10 PM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
गौतम खट्टरविरुद्ध राज्यभरात तक्रारी
Advertisement

माफी मागण्याची, अटक करण्याची मागणी : गोव्यात येण्यावरही बंदी घालावी : मंत्री, आमदार, आयोजकांकडून खेद व्यक्त

Advertisement

वास्को : वास्कोतील टिळक मैदानावर भगवान परशुराम जन्मोत्सवात सेंट फ्रांसिस झेवियर यांची निंदा करण्याच्या प्रकरणाचे वास्कोसह संपूर्ण गोव्यात पडसाद उमटले. काल सोमवारी काही ख्रिश्चन बांधवांनी वास्कोत मोर्चा काढून पोलिसस्थानकात जमाव केला. निंदा करणाऱ्या गौतम खट्टर यांच्याविरुद्ध वास्कोत सहा तक्रारी दाखल झाल्या असून गोव्यातील अन्य पोलिसस्थानकांमध्येही तक्रारी दाखल झाल्या आहेत. खट्टर यांनी माफी मागावी, त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

शनिवारी रात्री टिळक मैदानावर झालेल्या भगवान परशुरामांच्या जन्मोत्सवात गौतम खट्टर या तरुण नेत्याने सेंट फ्रांसिस झेवियर यांच्याविरूद्ध अवमानास्पद उद्गार काढले होते. त्याच्या भाषणाचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर रविवारी ख्रिश्चन बांधवांमध्ये संताप पसरला. रात्री वास्को पोलिसस्थानकात कुठ्ठाळीचे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष पिटर डिसोजा यांनी त्या वक्त्याविरूद्ध तक्रार केली. काल सोमवारी सकाळी बरेच लोक टिळक मैदानाजवळ एकत्र आले. त्यानंतर या लोकांचा जमाव मोर्चाने वास्को पोलिसस्थानकावर गेला आणि त्यांनी गौतम खट्टर याच्याविरूद्ध तक्रार दिली. बराच वेळ हा जमाव पोलिसस्थानकात होता. माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोजा व काही समाजसेवकांचाही यात सहभाग होता.

Advertisement

खट्टरच्या शोधासाठी पथके पाठवली जाणार

संध्याकाळी कॅथलिक असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी वास्को पोलिसस्थानकात गौतम खट्टर याच्याविरूध्द तक्रार नोंदवली व अटक करण्याची मागणी केली. वास्कोत आतापर्यंत सहा तक्रारी दाखल झालेल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक गुरूदास कदम यांनी दिली. काँग्रेस गट अध्यक्ष पिटर डिसोजा, माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोजा, आमदार अॅड. कार्लोस फेरेरा, फिडॉल पेरेरा, सिरील फर्नांडिस यांचा तक्रारदारांमध्ये समावेश आहे. गौतम खट्टर यांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गोवा सोडलेला आहे. त्यांना गोव्यात आणण्यासाठी आमची पथके पाठवली जाणार आहेत. आतापर्यंत साक्षीदारांच्या जबान्या घेण्यात आलेल्या असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

मंत्री, आमदार, आयोजकांकडून खेद

मंत्री माविन गुदिन्हो यांनीही त्या सोहळ्यात गौतम खट्टर यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. हा गोव्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे. गोवेकर अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही. खट्टर याच्याविरूध्द कडक कारवाई व्हायलाच हवी. प्रकरणाचा राजकारणासाठी कुणी वापर करू नये. आपल्याला या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. चांगले ऐकण्यासाठी मी गेलो होतो. मात्र, खटकणारे भाषण बंद करण्याची सूचना दोन वेळा आपण केली होती असे मंत्री गुदिन्हो यांनी म्हटले आहे. आमदार दाजी साळकर यांनीही गौतम खट्टर यांच्या अवमानकारक वक्तव्यांचा निषेध केला आहे. हा गोव्यासाठी दुदैर्वी असून अशी वक्तवे सहन करणार नाही. अशाने गोव्यातील शांततेला गालबोट लागू शकते.

मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले असल्याचे दाजी साळकर म्हणाले. आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले की सेंट फ्रांसिस झॅवियर यांच्याबद्दल काढण्यात आलेले गैर उद्गार हा दुखद प्रकार आहे. सोहळ्याच्या आयोजकांनी गौतम खट्टर यांचे भाषण बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न सफल झाला नाही. जे घडले ते चुकीचे घडलेले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे. पोलिस योग्य ती कारवाई करतील असे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले. आमदार अँथनी वास तसेच जिल्हा पंचायत सदस्य मेर्सियांना वास यांनीही सेंट झेवियर यांच्यावरील अवमानकारक वक्तव्यांचा निषेध केला आहे. सरकारने या व्यक्तीविरूध्द कारवाई करावी तसेच त्यांना गोव्यात येण्यावरही बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

कायद्यानुसार कडक कारवाई होईल : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गौतम खट्टर यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गोव्याबाहेरील वक्त्यांनी येथे येऊन धार्मिक सलोखा बिघडेल अशी विधाने करू नयेत. आयोजकांनी कार्यक्रमांचे आयोजन करताना वक्त्यांना आधीच योग्य समज देणे आवश्यक आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून संशयितावर कडक कारवाई केली जाईल. व्यासपीठावरील आमदारांनी वक्त्याला तिथेच थांबवायला हवे होते, मात्र काहीवेळा तातडीने तसे करणे शक्य होत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement
Tags :

.