आरोग्यमंत्र्यांच्या वागणुकीबद्दल मानवी हक्क आयोगाकडे तक्रार
माफीनामा आणि भरपाई देण्याची मागणी : आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या भूमिकेकडे
पणजी : बांबोळी येथील गोमेकॉमध्ये डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्याविऊद्ध भारतीय घटनेच्या कलम-21 खाली खासगी हक्क डावलल्याबद्दल आणि मानवी हक्काचे उल्लंघन केल्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध पर्वरी कल्याण फौंडेशनचे अध्यक्ष विकास प्रभुदेसाई आणि अन्य सात जणांकडून मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. शनिवार दि. 7 जून रोजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांचा सर्वांसमोर अवमान करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची धमकी दिली होती. हा सर्व प्रकार मंत्राच्या एका खासगी कॅमेरामनने चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने मानहानी आणि मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हाती असलेल्या पदाचा आणि सत्तेचा मंत्र्यांनी दुऊपयोग केल्याने एका सरकारी कर्मचाऱ्याची मानहानी होऊन त्यांना मान खाली घालावी लागली. या प्रकारामुळे राज्य आणि देशभर गोव्याचे, डॉक्टरांचे आणि गोमेकॉचे नाव बदनाम झाले असून ही ‘व्हीआयपी सेवा’ पद्धत बंद करण्याची मागणी होत आहे. राणेंच्या या मग्रुरीमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले असून डॉक्टरांचे आणि रुग्णांचे खासगी आयुष्य उघड्यावर पाडल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या गोष्टीची आयोगाने तात्काळ दखल घेऊन सर्व प्रकारची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई अशी मागणी केली आहे. याशिवाय डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या उघड अवमानामुळे झालेल्या मानहानी आणि मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई द्यावी आणि मंत्रांनी सार्वजनिक माफी मागण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.