For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री जमीर अहमद यांच्यासह तिघांविरुद्ध हायकमांडकडे तक्रार

06:26 AM Apr 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंत्री जमीर अहमद यांच्यासह तिघांविरुद्ध हायकमांडकडे तक्रार
Advertisement

राज्य काँग्रेसमधील अल्पसंख्याक नेत्यांमध्ये दुफळी शक्य

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले असले तरी सत्ताधारी काँग्रेसमधील मुस्लीम नेत्यांमधील मतभेद उफाळून आले आहेत. दावणगेरे पोटनिवडणुकीत मंत्री जमीर अहमद खान, विधानपरिषद सदस्य नासीर अहमद, अब्दुल जब्बार यांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार न करता विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी मंत्री जमीर अहमद खान यांच्यासह तिघांविरुद्ध हायकमांडकडे तक्रार दिली आहे. त्यामुळे राज्य काँग्रेसमधील गोंधळ चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

जमीर अहमद खान, नासीर अहमद, अब्दुल जब्बार यांच्याविरोधात सुरजेवाला यांनी पक्षाच्या हायकमांडला दोन पानी अहवालासोबत तक्रार दिली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारसही त्यांनी केली आहे.

दावणगेरे दक्षिण मतदारसंघांत काँग्रेसने शामनूर शिवशंकरप्पा यांचा नातू व मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांचे पुत्र समर्थ मल्लिकार्जुन यांना पोटनिवडणूक रिंगणात उतरविले होते. मात्र, अल्पसंख्याक नेत्याला तिकीट द्यावे, अशी मागणी जमीर अहमद यांनी केली होती. यामुळे मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांनी एकेरी शब्दप्रयोग करत टिप्पणी केली होती. यामुळे अल्पसंख्याक समुदायाचे नेते नाराज झाले होते.

यामुळे मंत्री जमीर अहमद खान हे दावणगेरे दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासघ्टी येतील की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली होती. परंतु, जमीर अहमद यांनी एस. एस. मल्लिकार्जुन यांच्या निवासस्थानी येऊन भोजनाचा आस्वाद घेतला. समर्थ हे शंभर टक्के निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला होता. मी केरळ निवडणुकीसाठी स्टार प्रचारक होतो. त्यामुळे प्रचाराला येऊ शकलो नाही. आता आलो आहे. बागलकोटला पुन्हा जाईन, असे सांगितले होते.

पत्रकार परिषदेत टिकास्त्र

आमदार रिझवान अर्शद, सलीम अहमद, यासीन खान पठान आणि बिल्किस बानो यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत काही धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. दावणगेरे पोटनिवडणुकीत प्रचारापासून आलिप्त राहून काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्याचा कट आमच्यातील काही नेत्यांनी रचला होता.  याबाबत मुख्यमंत्री व केपीसीसी अध्यक्षांना माहिती देण्यात आली आहे. कारस्थान असून देखील अल्पसंख्याक मतदारांनी काँग्रेसला मतदान केले आहे. बागलकोट व दावणगेरे दक्षिणमध्ये काँग्रेसचा विजय होईल. दावणगेरेत आमच्यावर सोपविलेली निवडणुकीची जबाबदारी आम्ही पद्धतशीरपणे हाताळली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

.