For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलकर्णी ग्रा.पं.पीडीओ विरोधात तक्रार

10:08 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
हलकर्णी ग्रा पं पीडीओ विरोधात तक्रार
Advertisement

जमाबंदी कार्यक्रमात नागरिकांकडून पीडीओ धारेवर, बदलीची मागणी

Advertisement

खानापूर : शहराला लागूनच असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतचा भ्रष्टाचार तसेच अकार्यक्षम आणि कार्यालयात उपस्थित रहात नसलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीच्या पीडीआ रेश्मा पाणीवाले यांच्याविरोधात शुक्रवारी झालेल्या जमाबंदी कार्यक्रमावेळी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आणि वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी अधिकाऱ्यांसमोरच पाणीवाले यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. आणि पुराव्यासहित पाणीवाले यांच्याविरोधात आवाज उठविला. यावेळी उपस्थित नागरिकांनी पाणीवाले यांच्या बदलीची मागणी लावून धरली होती.

शहराला लागूनच असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायतीचे पीडीओ रेश्मा पाणीवाले यांच्या अकार्यक्षमतेबद्दल सामान्य नागरिकांच्या शासकीय कामाला होत असलेला विलंब तसेच ग्राम पंचायतीतील भ्रष्टाचाऱ्याने गाठलेला कळस याच्याविरोधात ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. शुक्रवारी पंचायत कार्यालयात वार्षिक जमाबंदीची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यासह हलकर्णी पंचायत क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

यावेळी ईश्वर घाडी यांनी, रेश्मा पाणीवाले यांच्याविरोधात प्रश्नांचा भडिमार करत त्यांना धारेवर धरले होते. यावेळी घाडी बोलताना म्हणाले की, पाणीवाले या न्यायालयीन आदेशाचेही पालन करत नाहीत. बेळगाव, खानापूर रस्त्यावरील कोर्ट परिसरात खानापूर शहराच्या प्रवेशद्वारावरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. या कचऱ्याची उचल होत नसल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात न्यायालय, महाविद्यालयाची इमारत यासह इतर शासकीय कार्यालये आहेत. तसेच खानापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असल्याने शहरात प्रवेश करताना दुर्गंधी तसेच कचऱ्यातून शहरात प्रवेश करावा लागत आहे. कचरा उचलण्यासाठी वाहने उपलब्ध असतानासुद्धा कचऱ्याची उचल करण्यात येत नाही.

पीडीओंच्या कारभाराबाबत नागरिकांत असंतोष

ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील नागरिकांना विना हरकत पत्र देण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी केली जाते. बीपीएल कार्डधारकांचे अर्ज स्वीकारले जात नाही. विनाहरकत पत्रासाठी सामान्य नागरिकांना वेठीला धरुन मोठी रकम वसूल करण्यात येत आहे. पाणीवाले या ग्रा. पं. कार्यालयात कधीच वेळेत उपस्थित रहात नाहीत. यल्लाप्पा पाटील या रहिवाशाला गेल्या दोन वर्षापासून उतारा देण्यात आलेला नाही. बेळवडी यांना कर्जाचा बोजा चढवून देण्यासाठी गेल्या वर्षभरापासून ग्रा. पं.चे हेलपाटे मारावे लागत आहेत. यासह कार्यक्षेत्रातील नागरिकांना कामासाठी वेठीला धरुन मोठी रकम वसूल करण्यात येत आहे. एन. ए. लेआऊट असलेल्या प्लॉटधारकांचे अचानक गेल्या वर्षभरापासून उतारे देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीवाले यांच्या कारभाराबाबत नागरिकांतून असंतोष पसरलेला आहे. तसेच नागरिकांना पाणीवाले यांच्या कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी पाणीवाले यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.