बेळवट्टी ग्राम पंचायत उपाध्यक्षांविरोधात तक्रार
वार्ताहर/किणये
बेळवट्टी ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्षाच्या विरोधात शुक्रवार दि. 31 रोजी ग्राम पंचायत सदस्यांनी तक्रार दिली आहे. ग्राम पंचायत उपाध्यक्ष हे मनमानी कारभार करत आहेत. याचा अन्य सदस्यांना नाहक त्रास होत आहे. तसेच ग्राम पंचायतींच्या विकासाच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ लागला आहे. यामुळे त्यांच्याबद्दल अविश्वास ठराव मान्य करण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांकडे ग्राम पंचायत सदस्यांनी लेखी तक्रार दिली आहे. बेळवट्टी ग्राम पंचायतीमध्ये एकूण 11 सदस्य आहेत. यामध्ये निकीता कृष्णा कांबळे या मयत झालेल्या आहेत. त्यांची एक जागा रिक्त आहे. सध्या 10 सदस्य आहेत. उपाध्यक्ष हे मनमानी कारभार करू लागले आहेत. अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयात येऊन त्यांच्याविरोधात अविश्वासाच्या ठरावाची निवेदने सहाय्यक उपायुक्त आणि उपविभागीय दंडाधिकारी श्रवण नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा महादेवी मेदार, सदस्य मधू नलवडे, निशा चांदीलकर, विठ्ठल पाटील, रेणुका सुतार, रेश्मा कुलम, रुपा सुतार, धाकलू पाटील आदी सदस्यांनी ग्राम पंचायत उपाध्यक्षांच्या विरोधातील तक्रार ठरावावर सह्या केल्या आहेत.