बोगस 101 डॉक्टरांविरोधात तक्रार
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जिल्ह्यात शेकडो बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटले असून त्यांच्याकडून ग्रामीण रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. त्यामुळे जिह्यातील 101 बोगस डॉक्टरांविरोधात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. यापैकी काही तक्रारी निनावी असल्या तरीही त्याची आरोग्य विभागाने दखल घेतली आहे. यामध्ये 12 बोगस डॉक्टरांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये 7 डॉक्टरांविरोधात आरोग्य विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. प्राप्त तक्रारींची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्याच्या दुर्गम भागात आजही बोगस डॉक्टरांचे जाळे आहे. अनेक ठिकाणी त्यांनी दवाखाने थाटले असून गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये ते आघाडीवर असल्याचे अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे. बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी, जिल्हा, तालुकास्तर, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदस्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समित्या गठीत केल्या आहेत. पण या समित्यांना कामाचा काहीअंशी विसर पडल्यामुळे आजही बोगस डॉक्टरांचा ‘काळा बाजार’ सुरुच आहे. त्यामुळे सर्व स्तरावरील समित्यांना अॅक्टीव्ह करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिह्यातील सर्व डॉक्टरांची सर्वसमावेशक यादी तयार करून त्यातील डॉक्टरांनी दिलेली कागदपत्रे अधिकृत आहेत का, हे पाहण्यासाठी त्याबाबतची तपासणी मोहीम राबवणे आवश्यक आहे. यादी व्यतिरिक्त असलेल्या डॉक्टरांकडे अधिकृत कागदपत्रे नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सजगपणे बोगस डॉक्टर शोध मोहीम राबवून त्यांची कागदपत्रे तपासणी करून अवैध प्रॅक्टिस करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे अत्यावश्यक आहे. बोगस डॉक्टरकडे काम करणारे कर्मचारी, त्यांच्या प्रिक्रिप्शनवर औषधे देणाऱ्या औषध दुकानदारासह आरोपी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. पण प्रशासनाच्या या सुचनांनुसार संबंधित समित्यांकडून आवश्यक कार्यवाही होत नसल्याचे दिसते. त्यामुळे सीईओ कार्तिकेयन एस. यांनी तालुकास्तरीय बोगस डॉक्टर समितीने दरमहा आढावा बैठक घेऊन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
- तरीही कारवाईचे धाडस नाही
दुर्गम भागात पदवीधर डॉक्टरांची वाणवा आहे. त्यामुळेच अशा ठिकाणी बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. त्यांची सर्व माहिती त्या-त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवकांकडे उपलब्ध आहे. पण बोगस डॉक्टर आणि केंद्रातील संबंधित वैद्यकीय यंत्रणेमध्ये साटेलोटे असल्यामुळे त्यांच्याकडून बोगस डॉक्टरांची माहिती ाआरोग्य यंत्रणेकडे कळवली जात नसल्याचे वास्तव आहे.
- जिल्ह्यात 2524 अधिकृत खासगी वैद्यकीय व्यवसायिक
ग्रामीण भागात 2524 नोंदणीकृत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत. यामध्ये आजरा 113, चंदगड 129, गडहिंग्लज 165, भुदरगड 130, राधानगरी 129, करवीर 542, कागल 157, शिरोळ 292, हातकणंगले 521, शाहूवाडी 135, पन्हाळा 189, गगनबावडा 22 असे जिह्यात 2524 खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत. पण कोणतीही वैद्यकीय पदवी न घेतलेल्या बोगस डॉक्टरांची संख्या शेकडोंच्या घरात आहे.
- प्राप्त तक्रारींनुसार चौकशीचे आदेश
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे 101 बोगस डॉक्टरांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांनुसार चौकशी करून पुढील कारवाई करण्याच्या सूचना संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
- बोगस डॉक्टर आणि कारवाईची संख्या
तालुका तक्रारी दाखल गुन्हे
आजरा 2 0
गडहिंग्लज 5 0
चंदगड 2 0
भुदरगड 6 1
कागल 12 0
राधानगरी 11 1
करवीर 10 2
पन्हाळा 14 1
शाहूवाडी 09 1
गगनबावडा 5 0
हातकणंगले 15 1
शिरोळ 10 0
एकूण 101 7